अहमदनगर (शिर्डी) Ramesh Chennithala News : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार यावं यासाठी शिर्डी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केलीय. " लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला चांगले यश मिळावे, यासाठी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली आहे,"असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी सांगितलं.
जागावाटपाबाबत निर्णय नाही : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांचं आज (5 ऑगस्ट) शिर्डीत आगमन झालं. यानंतर त्यांनी साई मंदिरात जाऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय. माध्यमांशी बोलताना रमेश चेन्निथला," जागा वाटपाबाबत कुठलाही निर्णय अजून झालेला नाहीय. येणाऱ्या 7 ऑगस्ट रोजी जागावाटपाबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे. जागा वाटपाचा निर्णय दिल्लीत होत नाही तर तो महाराष्ट्रात होतो," असंही रमेश चेन्निथला
म्हणाले.
अजित पवारांचे घोटाळे संपले का? : "महायुती सरकारविषयी जनतेच्या मनात राग आहे. तोडाफोडीचे राजकारण करून 'आयाराम, गयाराम'वर महायुती सरकार राज्यात स्थापन झाले आहे. देशात सर्वात जास्त महाराष्ट्रात भ्रष्टाचार होतोय. अजित पवार यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोटाळ्याचा आरोप केला होता. मात्र अजित पवार भाजपाबरोबर आल्यानं सगळे घोटाळे संपले का? असं मी नाही तर राज्यातील जनता विचारत आहे. सगळ्यात जास्त भ्रष्टाचार राज्यातील महायुती सरकार करत आहे," असा आरोप यावेळी चेन्निथला यांनी केलाय.
निवडणुकींच्या जाहिरातींवर 70 कोटी खर्च : "राज्यात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी महायुती सरकार जाहिरातींवर खर्च करतेय. निवडणुकीच्या जाहिरातीसाठी राज्य सरकार 70 कोटी रुपये खर्च करत आहे," असा आरोप चेन्निथला यांनी महायुती सरकारवर केलाय. "सरकारच्या या भ्रष्टाचारामुळे राज्यातील जनता नाराज आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेनी आपली नाराजी दाखवून दिलीय. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील जनता या सरकारला त्यांची जागा दाखवून देणार आहे," असा विश्वास चेन्निथला यांनी व्यक्त केला.
हेही वाचा:
- अनिल देशमुखांच्या संदर्भात बदनामीकारक होर्डिंग; भाजयुमोचे शहराध्यक्ष बादल राऊतांवर गुन्हा दाखल, नेमका वाद काय ? - Anil Deshmukh Hoarding
- "लाडका मतदार योजना आणा म्हणजे सगळ्यांना पैसे वाटप करण्यासाठी मोकळे..." राज ठाकरेंची सरकारवर खोचक टीका - Raj Thackeray on Mahayuti
- अनिल देशमुखांची चांदीवाल आयोगाचा अहवाल जाहीर करण्याची मागणी, उपमुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले? - Fadnavis Vs Deshmukh