सातारा Prithviraj Chavan : भाजपानं ईडीच्या कारवाया केल्या. त्यातील एकाही कारवाईचा निकाल लागलेला नाही. त्यामुळं ईडीची भीती दाखवून पक्षांतर करायला लावण्याचं मॉडेल यापुढं चालणार नाही. विधानसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव निश्चित असल्याचा हल्लाबोल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ते आज साताऱ्यात माध्यमांशी बोलत होते.
ठोकाठोकीची भाषा फडणवीसांना शोभत नाही : भाजपाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठोकून काढण्याची भाषा केली होती. त्यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी ठोकाठोकीची भाषा फडणवीसांना शोभणारी नाही, असं सांगत फडणवीसांनी राजीनामा देण्याची मागणी त्यांनी केली. तसंच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. देशात वर्षभरात होणाऱ्या शेतकरी आणि मजुरांच्या आत्महत्यांमध्ये 38 टक्के आत्महत्या महाराष्ट्रातील आहेत. यावर्षीच्या पहिल्या सहा महिन्यात राज्यात 1267 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्यात अमरावती विभागात सर्वात जास्त आत्महत्या झाल्या आहेत. हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नसल्याचं चव्हाण म्हणाले.
दरडोई उत्पान्नात महाराष्ट्राची घसरण : दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची घसरण झाली आहे. महाराष्ट्र देशात 15 व्या क्रमांकावर घसरलाय, असंही पृथ्वीराज चव्हाणांनी निदर्शनास आणून दिलं. तसंच केंद्र शासनानंही शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडविल्यामुळंच लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसला असल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं. तसंच आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांच्या संदर्भातील प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, केंद्र शासनाच्या डीओपीटी मंत्रालयांतर्गत युपीएसी काम करते. पंतप्रधान नरेंद्र मोदीच या मंत्रालयाचे मंत्री आहेत. खेडकर प्रकरणात त्याची जबाबदारी काहीच नाही का? असा सवाल त्यांनी केला. युपीएससीच्या अध्यक्षपदाचा आणखी सहा वर्षे कार्यकाळ असताना त्यांनी राजीनामा का दिला? याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
हेही वाचा :