सातारा Mahabaleshwar Land Scam Case : महाबळेश्वर तालुक्यातील जमीन घोटाळा प्रकरणाची सोमवारी (29 जुलै) साताऱ्याच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली. जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि अनिल वसावे या दोघांची अन्य जिल्ह्यातही जमीन असल्यानं त्यांच्याबाबत शासनाकडं प्रस्ताव पाठवला जाणार आहे. तर उर्वरित आठ जणांची सुनावणी पूर्ण झाली आहे. त्याबाबतही लवकरच कारवाई केली जाईल.
जमीन घोटाळ्याची अंतिम सुनावणी पूर्ण : झाडाणी गावातील जमीन घोटाळा प्रकरणाची अंतिम सुनावणी सोमवारी झाली. त्यात जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे या दोघांची अन्य जिल्ह्यात जमीन असल्यानं महाराष्ट्र कमाल जमीन धारणा कायदा 1961 चे कलम 14 नुसार त्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा स्तरावर नसल्यानं या दोघांबाबत प्रस्ताव शासनाकडं पाठवला जाणार आहे. तर उर्वरित आठ जणांची सुनावणी पूर्ण झाली असून त्याबाबत लवकरच कारवाई होणार आहे.
जीएसटी आयुक्तांसह दोघांकडून कायद्याचं उल्लंघन : झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील तब्बल 620 एकर जमीन अहमदाबादचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाईकांनी बळकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात प्रशासनामध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले. याप्रकरणी चौकशी करण्यात आली असता जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवींसह दोघांनी कमाल जमीन धारण कायद्याचं उल्लंघन केल्याची बाब कागदपत्रांतून समोर आली.
दोघांच्या नावे सातारा, नंदुरबारमध्ये जमीन : जमीन घोटाळ्याचे गांभीर्य आणि व्याप्ती पाहता साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, पियूष बोगीरवार यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांविरोधात नोटीस काढून कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी तीन-चार तारखा झाल्यानंतर सोमवारी अंतिम सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे यांच्या नावे साताऱ्यासह नंदुरबार जिल्ह्यात जमीन असल्याचं कागदपत्रांवरून स्पष्ट झालं.
आठ जणांचा 12 ऑगस्टला फैसला : सातारा आणि नंदूरबार हे वेगवेगळ्या महसूल विभागात असल्यानं जिल्हा स्तरावर निर्णय घेण्याची तरतूद नाही. त्यामुळं महसूल विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडं यासंदर्भात प्रस्ताव पाठवला जाणार आहे. शासनाचं म्हणणं आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. उर्वरित आठ जणांनी कागदपत्रं सादर केली आहेत. तर याप्रकरणी 12 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार असून संबंधितांवर काय कारवाई होणार, हे त्या दिवशीच स्पष्ट होईल. याबाबत जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
हेही वाचा -
- जमीन घोटाळ्याच्या सुनावणीसाठी जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवींची कुटुंबासह हजेरी, मात्र अप्पर जिल्हाधिकारीच गैरहजर - Mahabaleshwar land scam case
- साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा जीएसटी आयुक्तांना दणका, झाडाणी गावातील अनधिकृत बांधकाम पाडणार - Jhadani Illegal Constructions
- महाबळेश्वरातील जमीन घोटाळ्याप्रकरणी जीएसटी आयुक्तासह तिघांना नोटीस; ११ जून रोजी सुनावणी - Mahabaleshwar land scam case