निफाडचा पारा 4.4 अंश, हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद; द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले - Nashik Temperature
Cold Wave In Nashik : राज्यातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद नाशिकच्या निफाड तालुक्यात झाली आहे. निफाडचा पारा 4.4 तर नाशिकमध्ये 8.6 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. यंदाच्या हिवाळी हंगामातील हे सर्वात नीचांकी तापमान असून पुढील दोन दिवस थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
Published : Jan 25, 2024, 2:47 PM IST
नाशिक Cold Wave In Nashik : आठ-दहा दिवसापासून निफाड तालुक्यातील नागरिकांना कडाक्याच्या थंडीने हैराण केलं आहे. गुरुवारी तालुक्यातील कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रावर पारा 4.4 अंशावर घसल्याची नोंद झाली आहे. हे या हंगामातील नीचांकी तापमान आहे. 2008 मध्ये निफाडचा पारा हा 0.7 अंशापर्यंत घसरला होता. तापमानात घसरण झाल्यानं द्राक्षाला मोठा धोका (Grapes Crop) निर्माण झाला आहे. तसेच कांदापात करपून जाण्याची भीती वर्तवली जात आहे. तर हंगामात प्रथमच तापमान इतके खाली घसरल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे.
द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला : उत्तर भारतातील शीतलहरीमुळं नाशिक जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या अखेर पासून हवामानात बदल झाला आहे. यामुळं द्राक्ष बागायतदार हैराण झाले आहेत. तापमानात घट होऊन थंडीत वाढ होत आहे. चालू द्राक्ष हंगामात 4.4 अंशावर पार घसरल्याने, द्राक्ष मण्यांना तडे जात आहेत. अति थंडीमुळं द्राक्ष घडांच्या पेशींचे कार्य मंदावत आहे. थंडी वाढल्यामुळं द्राक्ष बागेत शेकोटी पेटवून उब निर्माण केली जात आहे. मात्र दुसरीकडं गहू, कांदा, हरभरा या रब्बी पिकांसाठी हे वातावरण पोषक आहे.
5 फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट कायम राहणार : उत्तर भारतातील अनेक ठिकाणी होत असलेल्या हिमवृष्टीमुळं शीतलहरी तयार होत आहे. तसंच हवामानात गारवा येतोय. पुढील 5 फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट कायम राहील. मात्र 28, 29 जानेवारी रोजी तुरळक प्रमाणात ढगाळ हवामान तयार होणार आहे. तसंच तापमान काहीसे वाढण्याची शक्यता आहे. परंतु थंडीची लाटही 5 फेब्रुवारीपर्यंत राहील. त्यामुळं शेतकरी बांधवांनी नियोजन करावं असं हवामान तज्ञ दीपक जाधव यांनी सांगितलंय.
विदर्भात थंडीचा जोर वाढला : नागपूरसह विदर्भातही थंडीचा जोर वाढू लागला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांत तापमानात घट होत आहे. त्यामुळं बोचऱ्या थंडीचा प्रभाव जाणवू लागला आहे.
हेही वाचा -