कोल्हापूर CM Eknath Shinde : गेल्या दहा वर्षांत देशात कोणताही घोटाळा झाला नाही किंवा बॉम्बस्फोटही झाला नाही. हे सर्व पंतप्रधान मोदी यांची कमाल आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना विजयी करून पंतप्रधान मोदींचे हात बळकट करा, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. कोल्हापुरातील हॉटेल पॅवेलियन येथे महायुतीच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.
2047चं व्हिजन मोदींकडे : 2019 वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला विरोधी पक्ष म्हणूनसुद्धा संख्याबळ मिळालं नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आपला नेता निवडता आला नाही. त्यामुळे कणखर पंतप्रधान असलेल्या मोदींना आपलं मत देऊन देशाची प्रगती साधू असं आवाहन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, रामटेक सह विदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांना प्रचंड ऊन असतानाही झालेली गर्दी यांच्यावरचा विश्वास दृढ करत आहे. आता घरघर मोदी नाही तर मनमन मोदी अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. 2047 चा देश कसा असेल याचं व्हिजन पंतप्रधान मोदींकडे आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचं सर्वोच्च पद मिळण्यासाठी आपण प्रयत्न करूया, असं आवाहन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, भाजपा खासदार धनंजय महाडिक, महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक, धैर्यशील माने यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दोन्ही खासदारांसाठी मुख्यमंत्र्यांची फिल्डिंग : महायुतीचे कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज चांगलीच बिल्डिंग लावल्याचं चित्र पाहायला मिळालं. मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यात महायुतीचे दोन्ही उमेदवार निवडून आले पाहिजेत, यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या.
आमदार प्रकाश आवाडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला : दोनच दिवसांपूर्वी अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. आपण मोदींना पंतप्रधान करण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरलो असल्याचा प्रचार त्यांनी सुरू केला आहे. आज मुख्यमंत्री कोल्हापुरात आल्यानंतर आमदार आवाडे आणि कुटुंबीयांशी सुमारे तासभर बंद खोलीत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. चर्चा सकारात्मक झाली असून आमदार आवाडे यांची मनधरणी मुख्यमंत्री करतील आणि येत्या काही दिवसात वेगळं चित्र पाहायला मिळेल, अशी प्रतिक्रिया शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
हेही वाचा :
- मध्यपूर्वेत धोक्याची घंटा, इराणनं जप्त केलं इस्रायलचं जहाज; भारताकडून ॲडव्हायझरी जारी - Iran seizes Israeli ship
- ज्येष्ठांनी फुंकले 'एसटी'त प्राण; अमृत योजनेत ज्येष्ठांचा दरमहा 100 कोटींचा प्रवास - Amrit Yojana
- कल्याणचा गड जिंकण्यासाठी ठाकरेंची मोर्चेबांधणी, विनोद घोसाळकर यांच्यावर दिली जबाबदारी - Lok Sabha Elections 2024