मुंबई CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत शुक्रवारी वर्षा शासकीय निवासस्थानी संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी डेनिस फ्रान्सिस यांचं गणपती, छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देऊन स्वागत केलं. यावेळी डेनिस फ्रान्सिस यांनी त्यांच्या त्रिनिदाद, टोबैगो देशाच्या भारतासोबतच्या पूर्वीच्या संबंधांचा आढावा घेतला. यावेळी बोलताना फ्रान्सिस म्हणाले, त्रिनिदाद विधानसभेचेत सभापतीचं आसन भारतानं देणगी दिलेली आहे.
चैतन्यमयी मुंबई : मी भूगोलाचा विद्यार्थी असून भारत हा माझा अभ्यासाचा विषय असल्याचं सांगत डेनिस फ्रान्सिस यांनी मुंबईचं भारतातील महत्त्व अधोरेखित केलं. मुंबईत फिल्म इंडस्ट्री आहे. मी सुद्धा फिल्मी शौकीन आहे, पण मुंबईत सध्या ज्या प्रमाणात घरे, पायाभूत सुविधांची कामं सुरू आहेत, ती थक्क करणारी आहेत. महाराष्ट्र देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक राज्यांपैकी एक आहे. त्यामुळं मुंबईला विशेष महत्त्व आहे, असं फ्रान्सिस यांनी सांगितलं. प्रजासत्ताक दिनाच्या परेडला हजेरी लावताना ते म्हणाले, मुलांच्या देशभक्तीच्या भावनेनं मी प्रभावित झालो. आजच्या जगात शांतता, सुरक्षा महत्त्वाची आहे. सध्याच्या अस्थिर परिस्थितीत भारताची भूमिका महान, निर्णायक आहे. आमसभेचा अध्यक्ष या नात्यानं मी संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. महात्मा गांधींच्या विचारांवर आधारित भारतासारखा देश माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, असंही ते म्हणाले.
प्रदूषणावर मात, महिला सक्षमीकरण : संयुक्त राष्ट्रसंघासाठी प्राधान्यक्रम असलेला हवामान बदल महाराष्ट्रातही महत्त्वाचा आहे. आमचं सरकार पर्यावरणाच्या पूरक विकासावर लक्ष केंद्रित करतं. शाश्वत विकास हे सरकारचं ध्येय आहे. प्लॅस्टिक बंदी, बांबू लागवड, ग्रीन हायड्रोजन पॉलिसी, मुंबईत सुरू असलेली सखोल स्वच्छता मोहीम अशा उपाययोजना करून आम्ही पर्यावरणाचं रक्षण करत आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलंय. लेक लाडकी योजनांच्या माध्यमातून मुलींचं कल्यानं करत आहे. महिला बचत गटांचं बळकटीकरण करण्यात येत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. याशिवाय अंगणवाडी सेविकांना स्मार्ट मोबाईल वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
वडापाव, जिलेबीचा मेन्यू : आजच्या या बैठकीसाठी चहापानाबरोबर खास मुंबईचा वडापाव, जिलेबी असं पदार्थ ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी स्वत: या पदार्थांच्या लोकप्रियतेविषयी त्यांना माहिती दिली. तसंच त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या अध्यक्षासह इतर प्रतिनिधीसोबत या पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संयुक्तराष्ट्र महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस आणि संयुक्त राष्ट्रांचे शिष्टमंडळ विशेषत: उपस्थित होते. राजदूत रुचिरा कंभोज, स्टीव्हन फिलिप, कैशा मॅकग्वेरे, स्नेहा दुबे, स्टीव्हन फिलिप, शॉम्बी शार्प, संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी हम्मा मरियम खान या बैठकीला उपस्थित होत्या. यावेळी राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, परराष्ट्र मंत्रालयाचे राजेश गावंडे, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांचीही उपस्थिती होती.
हे वाचलंत का :