गुवाहाटी : राज्यात विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तत्पूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुवाहाटी दौऱ्यावर आहेत. मंगळवारी रात्री त्यांनी गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये रात्र काढली आणि पहाटे निलाचल डोंगरावर जावून कामाख्या देवीची पूजा केली.
देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी गुवाहाटीत : गुवाहाटी पोहोचताच एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "मी कामाख्या देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी गुवाहाटीला आलो आहे. गेल्या वेळी, सरकार स्थापनेपूर्वी आणि नंतरही मी कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो. तर यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले परिणाम दिसून येतील. यावेळी कामाख्या देवीच्या आशीर्वादाने निवडणूक जिंकून पुन्हा सत्तेत येणार असल्याचंही शिंदे म्हणाले.
मतदार आम्हाला मतदान करणार : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीची कामगिरी काय असेल असं विचारलं असता शिंदे म्हणाले की, "आम्हाला 100 टक्क्यांहून अधिक विश्वास आहे. गेल्या अडीच वर्षांत आमच्या सरकारनं केलेल्या कामांची तुलना केली तर, मतदार आम्हालाच मतदान करतील हे निश्चित आहे."
अनेक विकास कामे केली : शिंदे यांनी मागील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, "पायाभूत सुविधांच्या बाबतीत देशातील अव्वल राज्य असूनही महाविकास आघाडी सरकारने राज्याची वाटचाल ठप्प केली होती. पण सत्तेत येताच आम्ही सक्षम झालो. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करून रस्ते, उड्डाणपूल आणि मेट्रोच्या विकासाद्वारे विकासाला गती दिली. हे लोकांच्या लक्षात आलंय.
आम्हाला जिंकण्याचा विश्वास आहे : आपलं सरकार शेतकरी आणि लाडक्या बहिणींसाठी काम करेल. "आम्ही दिलेले वचन आम्ही पूर्ण करतो. लोकांनाही माहिती की, हे सरकार द्यायला आणि काम करायला तयार आहे. तसेच आमचे सरकार विकासासाठी काम करणारे सरकार आहे. त्यामुळंच आम्हाला जिंकण्याचा विश्वास आहे."
हेही वाचा -
- महाविकास आघाडीत तिन्ही पक्षांचं 85-85-85 जागांवर एकमत, उर्वरीत जागा घटकपक्षांसाठी, एकूण 270 जागांवर सहमती
- शिंदेंविरोधात केदार दिघे लढणार; ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, महाविकास आघाडीची 270 जागांवर सहमती
- विधानसभेच्या उमेदवार यादीत घराणेशाहीचं प्रतिबिंब, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कधी मिळणार संधी?