चंद्रपूर : छत्तीसगड राज्यातील बीजापूर इथं झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आलं आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. "देशातून नक्षलवादाचा खात्मा करायचा, हे आमचं ध्येय आहे. यापूर्वी अशा कारवाया करून नक्षलवाद संपुष्टात आणण्यात मोठं यश मिळालं. नक्षलवादाशी आता अंतिम लढाई सुरू झाली आहे. त्यादृष्टीनं ही मोठी कारवाई आहे," असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी दिवंगत बाबा आमटे यांच्या आनंदवनात आले होते. आनंदवनाच्या 75 व्या वर्षपूर्तीनिम्मित आयोजित कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली.
नक्षलवाद्यांचं मोठं जाळ उध्वस्त : छत्तीसगड राज्यात नक्षलविरोधी विशेष कृती दलानं केलेल्या कारवाईत 31 नक्षलवाद्यांना ठार केलं. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, "देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात देशातून नक्षलवाद संपुष्टात आणण्यात मोठं यश आलं आहे. गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं, त्यामुळं त्यांचं मोठं जाळं उध्वस्त झालं आहे. अशाच पद्धतीची कारवाई झारखंड, ओडिसा, तेलंगणा, छत्तीसगड राज्यात सुरू आहे. रविवारच्या कारवाईमुळं नक्षलवाद्यांचं कंबरडं मोडलं आहे. भविष्यात देशातून नक्षलवाद समूळ नष्ट करण्याच्या दृष्टीनं हे मोठं पाऊल आहे, त्या दृष्टीनं वाटचाल सुरू आहे."
जरांगेंचे नातेवाईक म्हणून कारवाई नाही : मनोज जरांगे पाटील यांच्या नातेवाईकांविरूद्ध वाळू तस्करी प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. "कुणाचा कोण नातेवाईक आहे हे जाणून कारवाई केली जात नाही. त्यामुळं जरांगे यांना बघून ही कारवाई झाल्याची शक्यता नाही. ज्यांनी गुन्हे केलेत अशांवरच कायदेशीर करवाई केली जाते. त्यामुळं जरांगेंबाबत मला काहीच माहिती नाही. याबाबत माहिती घेऊन प्रतिक्रिया देऊ," असं फडणवीस म्हणाले.
प्रतिक्रिया देणं योग्य नाही : राहुल गांधी यांनी राज्यात 70 लाख मतदार अचानक वाढले यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत "लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा केवळ एक खासदार निवडून आला असता, विधानसभा निवडणुकीत अचानक 40 पेक्षा अधिक आमदार कसे काय निवडून आले?" असा प्रश्न उपस्थित केला होता. तर अजित पवार यांनी या वक्तव्यावर राज ठाकरे यांचा खरपूस समाचार घेतला होता. त्यामुळं महायुतीमध्ये काही तेढ निर्माण झालाय का? या प्रश्नावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले की, "अजित पवार यांनी काय वक्तव्य केलं याबाबत कल्पना नाही. त्यामुळं यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही."
हेही वाचा :