छत्रपती संभाजीनगर Eknath Shinde On Uddhav Thackeray : "काही लोक ठाण्याला येऊन गेले, बरंच काही बोलले. पण आम्ही त्यांच्याकडं लक्ष देत नाही. काही दिवसांपूर्वी दिल्लीत लोटांगण घालायला जातात, असा आरोप आमच्यावर करणारे, आज दिल्लीत जाऊन बसत आहेत. ताल कटोरा स्टेडियममध्ये ते कशाला गेले हे सर्वांना माहिती आहे," असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. "आमचं काम करणारं सरकार आहे, घरी बसून ऑनलाईन काम करणारं नाही. फेस टू फेस काम करतो, शेतावर, बांधावर जाऊन सगळ्यांशी बोलून काम करतो. लाडकी बहीण असेल किंवा अन्य योजना, त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं विरोधकांच्या पोटात दुखत आहे. मात्र त्यांच्यासाठी दिवंगत बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे, तिथं मोफत उपचार मिळतील," अशी खोचक टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
व्होट बँक म्हणून बघणाऱ्यांना धडा शिकवा : "बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. वंचित घटकांसाठी त्यांनी केलेलं कार्य हे सर्वांसाठीच प्रेरणादायी आणि योग्य दिशा दाखवणारं आहे. मात्र काही लोक फक्त वोट बँक म्हणून पाहतात, त्यांना धडा शिकवणार आहात का नाही?" असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी जाहीर कार्यक्रमात केला. आंबेडकरी संघटनांतर्फे टिव्ही सेंटर मैदानात कृतज्ञता सोहळा घेण्यात आला. त्यावेळी "डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेलं संविधान बदलणं शक्य नाही," असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी दिला. बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळेस पराभूत करण्याचं काम कोणी केलं तर तो काँग्रेस पक्ष होता. मात्र 2015 मध्ये पहिल्यांदा संविधान दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साजरा केला. सार्वभौम राज्य म्हणून डॉ. बाबासाहेबांमुळेच देशाला ओळख मिळाली. त्यांचं योगदान आम्हाला नाकारता येणार नाही. त्यांचे उपकार हे कधीच विसरणं शक्य नाही. "सबका अभिमान, सबके दिल मे संविधान," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. "महापुरुष कोणत्या एका जाती किंवा समाजाचे नसतात, ते सर्वांचे असतात. त्यामुळेच त्यांचा आदर्श समोर ठेवून आम्ही सरकार चालवत आहोत," असं त्यांनी सांगितलं.
बहीण लाडकी, मनात धडकी! : "माझी लाडकी बहीण योजनेला सुरुवात केली, त्यामुळे अनेक कुटुंबांना आधार मिळणार आहे. त्यासाठी 44 हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून, लाडका भाऊ योजना देखील आणल्यानं त्यांना देखील आधार मिळणार आहे. मुलींसाठी शिक्षणाबाबत मोठा निर्णय आम्ही घेतला. आधी 50 टक्के सवलत होती, मात्र आता मोफत शिक्षण देण्याचा निर्णय सरकारनं घेतला. आपण त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहोत. निवडणूक आली की योजना आणल्या असं म्हणतात, मात्र "बहीण लाडकी आणि मनात धडकी," असं झाल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. "राखी पौर्णिमेच्या आधी दोन हप्ते येऊन पडतील, सावत्र भावापासून सावध राहा, न्यायालयानं देखील यांची याचिका फेटाळली आहे. तुम्ही दिलं नाही आणि आम्ही देतोय तर त्रास का होतोय, महिलांसाठी एसटीमध्ये 50 टक्के सवलत दिली. अनेक सुविधा ज्येष्ठांसाठी देखील दिल्या आहेत," असं त्यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितलं.
हेही वाचा :
- बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील नागरिकांना विशेष विमानाने आणणार; मुख्यमंत्री शिंदेंची माहिती - CM Eknath Shinde
- उद्धव ठाकरे यांचं मानसिक संतुलन बिघडलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका - CM Eknath Shinde
- शिवसेना शिंदे पक्षात नेमकं चाललंय काय? अनेक नेते नाराज, 'हे' नेते ठरतायत एकनाथ शिंदेंसाठी डोकेदुखी - Eknath shinde Shivsena