चंद्रपूर : तेलुगु सुपरस्टार तथा आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी (17 नोव्हेंबर) चंद्रपूरमध्ये आले होते. यावेळी पवन कल्याण यांना पाहण्यासाठी तुफान गर्दी झाली होती. चंद्रपुरात रोड शो झाल्यानंतर ते सभास्थळी पोहोचताच नागरिकांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर पवन कल्याण यांनी मराठी, हिंदी आणि तेलुगु भाषेत भाषण केलं.
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या संख्येनं तेलुगु भाषिक मतदार आहेत. यापूर्वी तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी घुग्गुस येथे काँग्रेसच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. त्यानंतर रविवारी महायुतीच्या प्रचारासाठी पवन कल्याण चंद्रपुरात आले. बल्लारपूर येथे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ 'जनसभा', तर चंद्रपूर येथे किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं.
मराठी, हिंदी आणि तेलुगु भाषेत भाषण : यावेळी पवन कल्याण यांनी तेलुगु, मराठी आणि हिंदी भाषेमध्ये संवाद साधला. सुरुवातीला त्यांनी ‘जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र’ असा जयघोष केला. तसंच शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींनाही अभिवादन केलं. "माझे मराठी शिकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मी मराठी बोलताना चुकलो तर मला क्षमा करा. पांडुरंगाच्या वारीची परंपरा असणाऱ्या या महाराष्ट्रात मला प्रचारवारीसाठी येता आलं, याचा आनंद आहे", अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
सुधीर मुनगंटीवार यांच्याविषयी काय म्हणाले? : पवन कल्याण म्हणाले, "ज्या बल्लारपूरच्या सागवाननं अयोध्येतील राम मंदिराचा कोपरा न् कोपरा सुगंधीत झाला. त्या बल्लारपूरचा विकास बघून मी थक्क झालोय. त्यामुळं ‘बाहुबली’ चित्रपटात ज्याप्रमाणे बाहुबलीनं राजमाता शिवगामीची पावलं थांबू दिली नाहीत. त्याचप्रमाणे तुम्ही देखील सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात विकासाची पावलं थांबू देऊ नका. बल्लारपूरच्या ‘पॉवरफुल्ल’ विकासासाठी मुनगंटीवार यांना अभूतपूर्व मताधिक्यानं विजयी करा", असं आवाहन यावेळी पवन कल्याण यांनी केलं.
विकासाच्या दिशेनं सुरू- पुढं ते म्हणाले, "सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासाच्या दृष्टीनं बल्लारपूरचा प्रवास सर्वांगीण विकासाच्या दिशेनं सुरू आहे. मुनगंटीवार यांनी एसएनडीटी, स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र मतदारसंघात आणून मोठं काम केलंय. भारताला आर्थिक महासत्ता होण्यासाठी आणि महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी अशाप्रकारच्या केंद्रांचं मोठं योगदान राहणार आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी अत्यंत महत्त्वाचं पाऊल टाकलं", असंही पवन कल्याण म्हणाले.
नागरिकांची गर्दी : 11 वाजता आयोजित करण्यात आलेल्या सभेला पवन कल्याण हे 3.30 वाजता पोहोचले होते. मात्र, ते येताच नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला. कल्याण यांना बघण्यासाठी व्यासपीठासमोर असलेल्या मंचावरदेखील लोक चढले होते. अखेर पोलिसांनी त्यांना खाली उतरवलं. यानंतर चंद्रपूर येथे रोड शो आणि बाईक रॅली दरम्यान देखील अशीच गर्दी झाली. मात्र, कल्याण यांना आधीच उशीर झाल्यानं त्यांना हा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला.
हेही वाचा -