पुणे Sasoon Hospital : पुण्यातील कल्याणी नगर येथील हिट अँड रन प्रकरणात अनेक गंभीर बाबी आता बाहेर येऊ लागल्या आहेत. अशातच आता बीजे मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना बुधवारी तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलं असून त्यांच्या जागेवर अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामतीचे अधिष्ठाता डॉ चंद्रकांत म्हस्के यांच्याकडं अतिरिक्त कारभार सोपवण्यात आलाय. आज अतिरिक्त अधिष्ठाता डॉ चंद्रकांत म्हस्के यांनी ससून हॉस्पिटलचा कार्यभार स्वीकारला असून त्यांनी ससूनच्या डॉक्टरांबरोबर पाहणी करत विभाग प्रमुखांची बैठकही बोलावली आहे.
म्हस्केंकडे अतिरिक्त कार्यभार : पुण्यातील कल्याणी नगर येथील हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्या प्रकरणी ससून हॉस्पिटलमधील डॉ अजय तावरे, डॉ श्रीहरी हाळनोर आणि अतुल घटकांबळे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आणि पुन्हा एकदा ससून हॉस्पिटलबाबत अनेक मुद्दे उपस्थित केलं जाऊ लागले. बुधवारी ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं असून त्यांच्या जागेवर अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामतीचे अधिष्ठाता डॉ चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे.
काय म्हणाले म्हस्के : आज पदभार स्वीकारल्यावर डॉ चंद्रकांत म्हस्के म्हणाले, "मी आज सकाळी ससून हॉस्पिटलचा पदभार स्वीकारला आहे. हॉस्पिटल मधील वॉर्ड, ओपीडी तसंच सर्व विभागांची पाहणी करण्यात आलेली आहे. तसंच आज बी जे मेडिकल कॉलेजची कौन्सिलिंग देखील करण्यात येणार आहे. तसंच आज विभाग प्रमुख यांची बैठक घेऊन रुग्ण सेवा कशी सुधारता येईल आणि येथील विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण कशा पद्धतीनं देण्यात येईल यासाठी प्रयत्न करण्यात येईल." तसंच जी काही घटना घडलीय त्याबाबत म्हस्के यांना विचारलं असता यापुढं असं होणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल असं यावेळी म्हस्के म्हणाले. ससून हॉस्पिटलच्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक बोलावण्यात आली असून सर्वांनी नियमानुसार काम करावं अशी सक्त ताकीद देखील यावेळी म्हस्के यांनी दिलीय.
हेही वाचा :