मुंबई : चांदिवली मतदारसंघाची आमदारकी कायम राखण्यासाठी विद्यमान आमदार दिलीप लांडे यांची लढाई सुरू आहे. तर गेल्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी आरिफ नसीम खान प्रयत्नशील असल्याचं बघायला मिळतंय.
2019 च्या निवडणुकीत काय घडलं? : मुंबई उपनगर जिल्ह्यात अंतर्भाव होणारा चांदिवली मतदारसंघ हा उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात येतो. चांदिवली मतदारसंघात 4 लाख 46 हजार 767 मतदार आहेत. या मतदारसंघातून 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे दिलीप लांडे यांनी विजय मिळवला होता. त्यांनी कॉंग्रेसच्या आरिफ नसीम खान यांचा पराभव केला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत दिलीप लांडे हे अवघ्या 409 मतांनी विजयी झाले होते.
दिलीप लांडे विरुद्ध आरिफ नसीम खान : दिलीप लांडे हे महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर जागा कायम ठेवण्याचं आव्हान आहे. तर, अवघ्या 409 मतांनी आमदारकी हिरावली गेल्यानं आरिफ नसीम खान या निवडणुकीत गेल्या निवडणुकीच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या मतदारसंघातून महेंद्र भानुशाली यांना उमेदवारी दिली आहे.
मनसे फॅक्टर महत्त्वाचा ठरणार?या मतदारसंघात एकेकाळी मनसेची चांगली ताकद होती. मात्र, त्यांना मिळणारी मतं सातत्यानं कमी होत गेल्याचं चित्र आहे. 2009 मध्ये मनसेमधून उभे असलेल्या दिलीप लांडे यांना 48 हजार 901 मतं मिळाली होती. 2014 मध्ये मनसेकडून उभे राहिलेल्या ईश्वर तायडे यांना 28 हजार 678 मतं मिळाली होती. तर, 2019 च्या निवडणुकीत मनसेच्या सुमित बारस्कर या उमेदवाराला 7 हजार 98 मते मिळाली होती. या निवडणुकीत मनसे किती मतं मिळवणार? हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा -