मुंबई Over Head Wire Break Down : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचे 'मेगा हाल' झाल्याचं पाहायला मिळालं. आज (5 ऑगस्ट) दुपारी कल्याण आणि ठाकुर्ली स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यानं त्याचा मध्य रेल्वेच्या सेवेवर परिणाम झाला. मध्य रेल्वेच्या दुरुस्ती पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत सुमारे दोन तासांत वायर जोडली. त्यानंतर लोकल सेवा सुरू करण्यात आली. मात्र, यामुळं मध्य रेल्वेची मेन लाईनवरील वाहतूक 20 ते 30 मिनिटं उशिरानं सुरू राहिली आहे.
आज दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान ओव्हरहेड तुटली. त्यामुळं अनेक स्थानकांवर लोकल गाड्या थांबल्या. प्रवाशांना लोकल ट्रेनमधून उडी मारून रेल्वे ट्रॅकवर चालावं लागलं. ओव्हरहेड वायर तुटल्याची माहिती मिळताच रेल्वे दुरुस्ती पथक तातडीनं घटनास्थळी पोहोचले आणि दोन तासांच्या प्रयत्नानंतर वायर जोडण्यात आली. रेल्वे सेवा सुरू झाली असली तरी गाड्या उशिरानं धावत आहेत. प्रवाशांनी यांची नोंद घ्यावी.- डॉक्टर स्वप्निल नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
मेल-एक्सप्रेसलाही गोंधळाचा फटका-याबाबत अधिक माहिती अशी की, ओव्हरहेडची दुरुस्ती करण्यासाठी ओव्हरहेड वायरमधील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळं ठाणे ते कल्याण आणि त्यापुढील लोकल वाहतूक बंद करण्यात आली. तसंच अप आणि डाउन दोन्ही मार्गावर लोकल धावत नसल्यानं ठाण्याच्या पुढील सर्वच रेल्वे स्थानकात प्रवाशांची एकच गर्दी झाली होती. मध्य रेल्वेनं दुपारी 3 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास अप मार्गावर 15 किमीच्या वेगानं लोकल चालविण्यास सुरुवात केली. परंतु, गाड्या एका मागोमाग एक उभ्या राहिल्यानं गाड्यांचं बंचिग झाले होते. अनेक मेल-एक्सप्रेसलाही या गोंधळाचा फटका बसला.
प्रवाशांचे हाल - ओव्हर हेड वायरमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी मध्य रेल्वेनं अप आणि डाउन दोन्ही मार्गावर ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला. रेल्वेनं दिवा ते कल्याणदरम्यान डाउन मार्गावर दुपारी 3 वाजून 20 मिनिटांपासून तर दुपारी 4 वाजल्यापासून कल्याण ते दिवा दरम्यान अप मार्गावर ब्लॉक घेतला. यामुळं लोकल वाहतूक पूर्णपणेच बंद राहिली. परिणामी स्थानकातील गर्दी वाढल्यानं प्रवाशांचे हाल झाले.
स्थानकात प्रवाशांची दुपारपासूनच प्रचंड गर्दी - दरम्यान, संध्याकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी अप आणि डाउन सर्वच रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात रेल्वेला यश आले. तोपर्यंत कामावरुन घरी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांची स्थानकात एकच गर्दी झाली होती. ठाणे आणि त्यापुढील प्रत्येक स्थानकात प्रवाशांची दुपारपासूनच प्रचंड गर्दी होती. या सर्व गोंधळामुळं मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील 20 लोकल रद्द करण्यात आल्या तर 100 हून अधिक गाड्यांना लेट मार्क मिळाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं रात्री उशिरापर्यत मेन लाईनवरील लोकल विलंबाने धावतील.
हेही वाचा -