मुंबई CBI Raid On Passport Seva Kendra : खोट्या कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट तयार करुन देण्यासाठी सहाय्य करण्याच्या आरोपावरुन केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (CBI) ने शनिवारी मुंबई आणि नाशिकमधील दोन पासपोर्ट सेवा केंद्रांशी संबंधित ३३ ठिकाणी छापेमारी केली. या प्रकरणात चौकशी केल्यानंतर ३२ जणांविरोधात १२ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये लोअर परळ आणि मालाड येथील पासपोर्ट सेवा केंद्रात (पीएसके) कार्यरत असलेल्या पासपोर्ट सहाय्यक, वरिष्ठ पासपोर्ट सहाय्यकांचा समावेश आहे. पासपोर्टसाठी केलेल्या अर्जातील त्रुटींकडं दुर्लक्ष करुन नियमांना बगल देत पासपोर्ट तयार करण्याचं काम या माध्यमातून केल्याचा आरोप करण्यात आलाय.
बेकायदा पध्दतीनं केली मदत : मुंबईतील पासपोर्ट सेवा केंद्रात कार्यरत असलेले हे अधिकारी पासपोर्ट फॅसिलिटेशन मध्यस्थांशी थेट संपर्कात होते. या मध्यस्थांच्या मार्फत करण्यात आलेल्या विविध अर्जदारांना त्यांची कागदपत्रे पूर्ण नसताना, बोगस कागदपत्रे जोडलेली असताना तसंच अर्जामध्ये पासपोर्ट धारकांच्या व्यक्तिगत माहितीसोबत छेडछाड केलेली असताना देखील पासपोर्ट देण्यात आले. निकष पूर्ण न करणाऱ्या अनेक अर्जदारांना याद्वारे बेकायदा पध्दतीनं मदत करण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अशा १८ पासपोर्ट फॅसिलिटेशन मध्यस्थांबाबत आलेल्या तक्रारीनंतर सीबीआयने या प्रकरणी चौकशी सुरू केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
मोठी रक्कम उकळल्याचा आरोप : या प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या अधिकाऱ्यांनी या मध्यस्थांकडून मोठा आर्थिक लाभ मागितल्याचा आणि मोठी रक्कम उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, बोगस पासपोर्ट बनवण्यामध्ये सहभागी असलेल्या फॅसिलिटेशन करणाऱ्या मध्यस्थांच्या संपर्कात पासपोर्ट सेवा केंद्रातील काही अधिकारी थेट संपर्कात होते. यामुळं थेट देशाच्या सुरक्षेशी तडजोड करण्याचा प्रकार त्यांनी केला आहे, असं एफआयआरमध्ये नमूद करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
३३ ठिकाणी सीबीआयचे छापे : मुंबई आणि नाशिकमधील काही सरकारी अधिकारी तसंच काही खासगी व्यक्तींशी संबंधित ३३ ठिकाणी सीबीआयने छापे मारले या छाप्यांमध्ये पासपोर्ट तयार करण्याशी संबंधित अनेक कागदपत्रे तसंच डिजिटल पुरावे सीबीआयच्या हाती लागले. या मध्यस्थांची पासपोर्टशी संबंधित कामे करुन पासपोर्ट सेवा केंद्रात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने त्याच्या खासगी बॅंक खात्यात आणि त्याच्याजवळच्या कुटुंबीयांच्या खात्यामध्ये काही लाख रुपये जमा करुन घेतले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हेही वाचा -