मुंबई : युक्रेन विरोधात रशियाच्या बाजूनं लढणाऱ्या युद्धात हैदराबादसह काही राज्यातील तरुणांचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे नोकरीचे आमिष दाखवून मानवी तस्करी सुरू असल्याचं उघडकीस आलं आहे. सीबीआयनं मानवी तस्करीचं मोठं नेटवर्क उद्ध्वस्त केलंय. 7 शहरांमध्ये 10 हून अधिक ठिकाणी छापेमारी सुरू आहे. दिल्ली, तिरुवनंतपुरम, मुंबई, अंबाला, चंदीगड, मदुराई, चेन्नईत सीबीआयनं छापे टाकले आहेत.
एजंट्सविरुद्ध गुन्हा दाखल : चांगल्या नोकऱ्यांच्या नावाखाली तरुणांना रशिया-युक्रेन युद्धक्षेत्रात पाठवणाऱ्या विविध व्हिसा सल्लागार कंपन्या, एजंट्सविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 50 लाख रुपये, आक्षेपार्ह कागदपत्रे, लॅपटॉप, मोबाइल, डेस्कटॉप आदी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड जप्त करण्यात आलं आहे. काही संशयितांना विविध ठिकाणांहून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. आतापर्यंत परदेशात पाठवलेल्या पीडितांची जवळपास 35 प्रकरणे समोर आली आहेत.
परदेशात नोकऱ्या देण्याचं आश्वासन : परदेशात नोकऱ्या देण्याचं आश्वासन दाखवत तरुणांची मानवी तस्करी करणाऱ्या मोठ्या नेटवर्कचा सीबीआयनं पर्दाफाश केला आहे. हे तस्कर एक संघटित नेटवर्क म्हणून कार्यरत आहेत. देशातील अनेक तरुणांना एजंटांनी रशियात उच्च पगाराच्या नोकऱ्या देण्याचं आश्वासन देऊन परदेशात पाठवलं होतं. तस्कर भारतीय नागरिकांना युट्युब, सोशल मीडिया चॅनेलद्वारे तसंच त्यांचा स्थानिक संपर्क, एजंटद्वारे नोकऱ्यांसाठी आमिष दाखवत होते. एजंटनं काही तरुणांकडून प्रति व्यक्ती 3.5 लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांना युक्रेन युद्धात लढण्यासाठी पाठवण्यात आलं, असा आरोप करण्यात येत आहे.
काही संशयित ताब्यात : 6 मार्च रोजी खासगी व्हिसा कन्सल्टन्सी फर्म, एजंटविरुद्ध मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोजगाराच्या नावाखाली रशियाला भारतीय नागरिकांची तस्करी होत असल्याचं आढळून आलं आहे. या एजंटांचे मानवी तस्करीचे जाळे देशभरातील अनेक राज्यांमध्ये पसरलेले आहे. या प्रकरणात सीबीआयनं दिल्ली, त्रिवेंद्रम, मुंबई, अंबाला, चंदीगड, मदुराई, चेन्नई येथे एकाचवेळी छापे टाकले आहे. काही संशयितांना विविध ठिकाणांहून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. आतापर्यंत परदेशात पाठवलेल्या पीडितांच्या जवळपास 35 घटना समोर आल्या आहेत. तस्करीच्या झालेल्या आणखी तरुणांची ओळख पटवली जात आहे.
हे वचालंत का :