कोल्हापूर Hatkanangle Cast Equation : लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि हातकणंगले या एकमेकांना लागून असलेल्या लोकसभा मतदारसंघांच्या उमेदवारीचा तिढा अजूनही सुटलेला नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दोनवेळा मातोश्रीवर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; मात्र महाविकास आघाडी सोबत येण्याला त्यांची असलेली नकारघंटा, महायुतीचे जाहीर झालेले उमेदवार धैर्यशील माने यांच्या उमेदवारीबाबतच असलेली संभ्रमावस्था आणि गत निवडणुकीत वंचित फॅक्टरने वेधलेले लक्ष यासोबत यावेळीही वंचितने दिलेला उमेदवार तसंच महाविकास आघाडीने ठोकलेला शड्डू यामुळे हातकणंगलेची लढत चौरंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मानेंनी शेट्टींच्या विजयाची हॅट्रिक रोखली : हातकणंगले, शिरोळ, इचलकरंजी, पन्हाळा-शाहूवाडी, इस्लामपूर, बत्तीस शिराळा या विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेला हातकणंगले लोकसभा मतदारसंघ यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक लक्षवेधी ठरला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी 2009, 2014 वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत सलग विजय मिळवत या मतदारसंघावर वर्चस्व निर्माण केले होतं; मात्र गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी शेट्टी यांच्या विजयाची हॅट्रिक रोखली. 2019 च्या निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राजकीय समीकरणे बदलली आणि खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ देत महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला. मतदार संघातील जनतेला माने यांचा निर्णय मान्य नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विकासकामे आणि थेट जनतेशी असलेला संवाद यांना बगल देत एकांगी राजकारण केल्यामुळे माने यांच्या विरोधात नाराजीचा सूर आहे. तर स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी गेल्या पाच वर्षांत ऊस दर आंदोलनाची धग कायम ठेवत मतदारसंघात चांगला संपर्क ठेवला आहे.
या कारणामुळे शेट्टींना मविआशी जुळवून घ्यावे लागणार : लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीशी फारकत घेत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील अनेक लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार घोषित केले. यामध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून दादासाहेब उर्फ डी. सी. पाटील यांची उमेदवारी घोषित केली आहे. महाविकास आघाडीकडून हातकणंगलेत आपल्याला पाठिंबा मिळेल अशी आशा ठेवलेल्या राजू शेट्टी यांना मात्र आता महाविकास आघाडीशी जुळवून घ्यावे लागणार आहे. कारण शाहूवाडी पन्हाळ्याचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांना महाविकास आघाडी मधून हातकणंगले लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी करण्यात येत आहे. यामुळे यंदाची लोकसभा चौरंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जातीय समीकरणावर उमेदवारांची भिस्त : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने मराठा आणि जैन समुदायांची ताकद मोठी आहे. यातच आता वंचित बहुजन आघाडीने जैन समाजाचा उमेदवार दिल्याने या मतांची विभागणी ठरलेली आहे. राजू शेट्टी हे जैन समाजाचे प्रतिनिधित्व करतात. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर मराठा समाजाचे आहेत. धैर्यशील माने हेही मराठा समाजाचे असल्याने या मतांची विभागणी नक्की होणार आहे. हातकणंगले लोक विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. हातकणंगले तालुक्यात बौद्ध समाजाची मतं निर्णायक असल्याने आणि वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार रिंगणात असल्यामुळे गत लोकसभा निवडणुकीत सव्वालाख मतांचा टप्पा गाठलेल्या वंचितच्या उमेदवाराला यंदाही ही मतं मिळणार का? तसं झाल्यास याचा फटका मागच्या निवडणुकीत राजू शेट्टींना बसला होता. आता धैर्यशील माने यांना जातीय समीकरणातून विभागल्या जाणाऱ्या मतांचा फटका बसेल का? याकडेही आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
नाराजांची बांधावी लागणार मोट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपा नेते आणि मयूर उद्योग समूहाचे प्रमुख संजय पाटील यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. भाजपा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनीही कोल्हापूर जिल्ह्यातील दोन पैकी एक जागा भाजपाला मिळावी अशी अपेक्षा केली होती. याही पुढे जाऊन शौमिका महाडिक यांना उमेदवारी मिळाल्यास आम्ही तयार असल्याचं वक्तव्य केलं होतं. लोकसभा मतदारसंघातील नाराजी कमी करून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची मोट बांधण्याचं आव्हान धैर्यशील माने यांच्यासमोर आहे. तर राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीकडून मशाल या चिन्हावर निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. यामुळे आता हातकणंगलेत घडणाऱ्या राजकीय घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या शिलेदारांनी केला अंतर्गत सर्वे : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकारी पांडुरंग पाटील आपल्या सहकाऱ्यांसमवेत शनिवारपासून मतदारसंघात फिरत आहेत. या दरम्यान त्यांनी आजी-माजी लोकप्रतिनिधी, विरोधी पक्षातील नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन धैर्यशील माने यांच्याबाबत चाचणी केली. याचा अहवाल दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांना पाठवला असल्याचं पाटील यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना सांगितलं; मात्र पक्षाने माने यांची उमेदवारी घोषित केली आहे. महायुतीच्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन माने यांना खासदार करण्यासाठी यापुढचे प्रयत्न असणार असल्याचं पांडुरंग पाटील यांनी स्पष्ट केलं.
मलकापूर शाहूवाडीत उमेदवारीचा जल्लोष : शाहूवाडी-पन्हाळ्याचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी आमदार पाटील यांचा मतदारसंघ असलेल्या शाहूवाडी या तालुक्यात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी करून आणि साखर, पेढे वाटून सत्यजित पाटील यांना विजयी करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
हेही वाचा :