छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून आता छुपा प्रचार सुरू झाल्याचं पहायला मिळतंय. त्यातच आता छत्रपती संभाजीनगरात मतदानकार्ड किंवा आधार कार्ड जमा करुन मतदान न करण्यासाठी पैसे दिले जात असल्याचं समोर आलंय. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. घडलेल्या प्रकारावरुन आता शिवसेनेचे (उद्धव ठाकरे ) उमेदवार राजू शिंदे आणि विधानपरिषदेचे नेते विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
नेमकं काय घडलं? : जवाहरनगर परिसरात एक व्यक्ती आधार कार्ड किंवा मतदानकार्ड जमा करत असल्याची माहिती शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार राजू शिंदे यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठले. लोकशाही पद्धतीनं मतदान करण्यापासून थांबवणाऱ्यांवर योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी, अशी त्यांनी मागणी केली. कार्ड जमा करणारे शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोपही त्यांनी केला. " आतापर्यंत विशिष्ट समुदायातील पाच हजार कार्ड जमा करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगानं त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करुन लोकशाहीच्या मारेकऱ्यांना सोडू नये," अशी त्यांनी मागणी केली.
एका कागदपत्राचे दोनशे रुपये कमिशन : राजू शिंदे यांनी गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, "मतदारांना मतदानकार्ड जमा करुन मतदान करू नये, यासाठी अगोदर दीड हजार रुपये आणि मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर दीड हजार रुपये मिळतील, असं आमिष दिलं जात होतं. विशिष्ट समुदायातील मतदारांची माहिती आणि कागदपत्र घेतली जात होती." तसंच ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तिला एका कागदपत्राचे दोनशे रुपये कमिशन मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
छत्रपती संभाजीनागरच्या जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोटाला शाई लावून, निवडणूक ओळखपत्र जमा करून घेऊन पैसे वाटप होत असल्याची बाब समोर आली आहे. या दरम्यान पोलिसांनी साधारण १८ लाखांची रक्कम जमा करून घेत अंदाजे २ कोटींची रक्कम आमदार संजय शिरसाट यांच्या फोननंतर सोडण्यात आल्याची…
— Ambadas Danve (@iambadasdanve) November 18, 2024
अंबादास दानवे यांची टीका : या घटनेनंतर विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या एक्सवर पोस्ट करत शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट यांच्यावर थेट टीका केली आहे. ते म्हणाले, "छत्रपती संभाजीनगरच्या जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोटाला शाई लावून, निवडणूक ओळखपत्र जमा करून पैसे वाटप होत असल्याची बाब समोर आलीय. या दरम्यान पोलिसांनी साधारण 18 लाखांची रक्कम जमा करून घेत अंदाजे 2 कोटींची रक्कम आमदार संजय शिरसाट यांच्या फोननंतर सोडण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. याचा अर्थ बहुदा निवडणूक आयोगाला संभाजीनगरात निःपक्षपाती निवडणूक घ्यायची नाही. 'कर्तव्यदक्ष' जिल्हाधिकारी आणि सगळी निवडणूक यंत्रणा असताना शाई कोणाच्या सांगण्यावरुन आणि कशी बाहेर आली? हा प्रश्न आहे. याचा तातडीनं खुलासा करायला हवा", असं दानवे म्हणालेत.
- रात्री अडीच वाजेपर्यंत पोलिसांमध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी पैसे देणारा आणि पैसे घेणारा अशा दोघांनाही अटक केली आहे.
हेही वाचा -