ठाणे Extortion Case Thane : पनवेलहून जयपूर येथे लोखंडी सळ्या घेऊन निघालेल्या दोघा ट्रेलर चालकाला रस्त्यात अडवून त्याच्याकडे १५ लाखांची खंडणी मागणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचारी आणि दोन पत्रकार तसेच त्यांचे तीन साथीदार अशा सहा जणांविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मुंबई- नाशिक महामार्गावरील रांजणोली नाका ब्रिजखाली (बायपास) येथे घडली. या गुन्ह्यातील दोन पत्रकारांना अटक करण्यात आली. मात्र, खंडणी बहादर पोलिसवाल्यासह चार आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
संजय तिवारी आणि हरेंद्र गौतम अशी अटक केलेल्या दोघे पत्रकारांची नावे आहेत. तर प्रविण जाधव असे फरार असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्याचा साथीदार बाबु शेख आणि दोन अनोळखी असे चार आरोपी फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ट्रेलर चालक राजू रामकरण गुजर (वय ३२) हे राजस्थान राज्यातील अजमेर जिल्ह्यातील सरसडी गावाचे रहिवासी आहेत. त्यांचा गुजर बदर्स ट्रेलर सर्व्हिस नावाने ट्रान्स्पोटचा व्यवसाय आहे. ते २ जुलै रोजी राजस्थानहुन पुणे येथे ट्रेलरमध्ये माल वाहतूक करीत असताना, त्यांना ४ जुलै रोजी पुन्हा पनवेल ते जयपूर लोखंडी सळ्या वाहतूक करण्यासाठी तक्रारदार व त्याचे मित्र भागचंद गुजर हे दोघे पनवेल - न्हावाशेवा येथून लोखंडी सळईने भरलेला ट्रेलर जयपूर येथे घेऊन जात होते. त्यातच ५ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास सळ्याने भरलेला ट्रेलर मुंबई - नाशिक महामार्गावरील रांजनोली नाका येथे ब्रिजखाली आला असता, आरोपी संजय आणि हरेंद्र या दोघांनी त्यांचा ट्रेलर अडवला. आणि आम्ही पत्रकार आहोत तुझ्या विरोधात कारवाई करू, असे बोलतं असतानाच आरोपी बाबु शेखसह वाहतूक पोलीस प्रवीण जाधव आणि इतर दोन जण रिक्षामधून तिथे आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलीस प्रवीण जाधव यांनी वाहतूक पोलीस असल्याचे सांगून ट्रेलरमध्ये असलेल्या लोखंडी सळईबाबत चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तक्रारदार राजू यांनी सळईचा माल जयपूर येथे घेऊन जात असल्याचे सांगत त्या मालाचे देयक दाखवले. तसेच ज्या सचिन खोत नावाच्या व्यक्तीने लोखंडी सळ्यांची वाहतूक करण्यासाठी सांगितले. त्यालाही तक्रारदार राजुने कॉल करून घटनेची माहिती दिली. यानंतरही, वाहतूक पोलीस प्रवीण यांनी दमदाटी करत १५ लाखांची मागणी केली. पैसे दिले नाहीतर कारवाई करण्याची धमकी दिली. त्यानंतर, वाहतूक पोलीस प्रविण जाधव यांनी पत्रकार संजय तिवारी आणि हरेंद्र गौतम यांना याठिकाणी थांबण्यास सांगून ते बाबू शेख तसेच इतर दोघांसोबत निघून गेले.
"घटनास्थळी गस्तीवर असलेले दोन पोलीस कर्मचारी आले असता त्यांनी चालक राजूकडे विचारणा केली असता, त्याने घडलेला प्रसंग सांगितला. त्यामुळं दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना संशय येताच, दोन्ही पत्रकारांसह दोन्ही ट्रेलर चालक, लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रेलरसह कोनगाव पोलीस ठाण्यात ५ जुलै रोजी दाखल झाले. यानंतर ट्रेलर चालक राजू गुजर यांच्या तक्रारीवरून बीएनएस या नवीन कायद्यातील कलम १२६ (२), ३(५), ३०८(२) प्रमाणे गुन्हा दाखल करून दोघा पत्रकारांना अटक केली. तर फरार असलेला वाहतूक पोलीस जाधव हा ठाणे वाहतूक शाखेत कार्यरत असून पोलीस पथक चार आरोपींचा शोध घेत आहे," अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांनी दिली असून या गुन्ह्याचा तपास एपीआय सपकाळ करीत आहेत.