नाशिक Nashik Crime : खर्च न दिल्याच्या किरकोळ कारणावरून पत्नीनं पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना म्हसरूळ येथील बोरगड परिसरात घडली. त्यामुळं परिसरात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पत्नीनं अन्य साथीदारांच्या मदतीनं पतीला मारहाण करून सर्पदंश करून जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, पतीनं या सर्वांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेत घराबाहेर पडून मित्राच्या मदतीनं जिल्हा रुग्णालय गाठलं. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर म्हसरूळ पोलीस ठाण्यात पत्नीसह अन्य संशयिताविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पत्नीसह संशयित दोन साथीदारांचा शोध घेत आहोत. लवकरच सर्वांना अटक केली जाईल - किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक नाशिक
तोंड उशीनं दाबून मारण्याचा प्रयत्न : म्हसरूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल पोपटराव पाटील (41, रा. उज्वलनगर) यांच्यावर त्यांची पत्नी सोनी उर्फ एकता राजेंद्र जगताप हिनं शनिवारी (दि. 27) रात्री दोन साथीदारांच्या मदतीनं हल्ला केला. विशाल पाटील यांच्या तक्रारीनुसार, एकतानं पती विशालला अगोदर बिअर पाजली. त्यानंतर तिनं जेवण देण्याच्या बहाण्यानं मागच्या दारानं घरात नेलं. त्यानंतर विशालला मारहाण केली. विशाल पाटील यांनी प्रतिकार केल्यानंतर एकतानंही पती विशाल पाटील यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल : त्याचवेळी संशयितांपैकी एकानं पिशवीतून साप काढत विशाल पाटील यांच्या हाताजवळ आणला असता, सापानं विशाल पाटील यांना चावा घेतला. त्यानंतर विशाल यांनी संशयितांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घराबाहेर पळ काढला. त्यानंतर मित्रांच्या मदतीनं विशाल पाटील यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वेळीच उपचार मिळाल्यानं विशाल पाटील यांचे प्राण थोडक्यात बचाबले आहेत. म्हसरूळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांच्या पथकानं विशाल पाटील यांची चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नीनं केला होता बनाव : विशाल पाटील यांनी जीव मुठीत धरून घरातून पळ काढल्यानंतर पत्नी एकतानं म्हसरूळ पोलीस ठाणे गाठून आपल्यावर हल्ला झाल्याचं सांगितलं. तसंच तिनं गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणण्यास सुरुवात केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी सांगितलं की, "विशालची पत्नी एकता तसंच संशयित फरार झाले असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत."
हे वाचलंत का :