मुंबई Abusing Disabled Girl : रविवारी सायंकाळी कुर्ला पश्चिम या ठिकाणी दिव्यांग मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या 65 वर्षीय आईने कुर्ला पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार रशीद मोहम्मद मुन्ना मन्सुरी या आरोपीविरोधात कलम 64(2), 64(2)(1) आणि 64(2)(क ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक खोत यांनी दिली आहे.
तक्रारदार 65 वर्षीय महिला कुर्ला येथे गेल्या पाच वर्षांपासून तिच्या दिव्यांग मुलीसोबत राहते. तिच्या 27 वर्षीय दिव्यांग मुलीवर गेल्या अनेक वर्षांपासून जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित मुलगी राहात असलेल्या चाळीच्या बाजूस गादी, उशा आणि पडदे बनवण्याचे दुकान असून हे दुकान रशीद मोहम्मद मुन्ना मन्सुरी याने गेल्या पाच वर्षांपासून भाड्याने घेतले. पीडित मुलीची आई त्याला ओळखतं.मुलीच्या आईला घरगुती मदतीसाठी अनेकदा रशीद मोहम्मद मुन्ना मन्सुरी हा आरोपी धावून येत असे. त्यामुळे आईचा रशीदवर विश्वास बसला होता.
रविवारी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान आरोपी रशीद याने तक्रारदार महिलेच्या मोबाईल नंबरवर फोन करून खिचडी घेण्यासाठी मुलीला दुकानावर पाठवून द्या, अशी विनवणी केली. त्यानंतर तक्रारदार महिलेने मुलीला रशीदच्या दुकानात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पाठवले. त्यानंतर 27 वर्षीय मुलगी सायंकाळी 7.40 वाजताच्या सुमारास घरी आली. तेव्हा ती अतिशय घाबरलेली होती. त्यावेळी आईला तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग आढळून आले. त्याबाबत तिला आईने विचारले असता पीडित मुलीने राशीदच्या दुकानावर घडलेला सर्व धक्कादायक प्रकार सांगितला.
पीडित मुलीच्या आईने आरोपीचे दुकान गाठले. मात्र, त्यावेळी दुकान बंद दिसून आले. दरम्यान, पीडित मुलीच्या आईने आजूबाजूला चौकशी केल्यानंतर एका दुकानदाराने सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास आरोपी रशीद याने त्या दुकानदाराच्या मोबाईलवर फोन केला आणि सांगितले की मी मुलीसोबत चुकीचे वर्तन केले असून तू त्यांच्या घरी जाऊन सेटल करून मदत कर. हे ऐकल्यानंतर पीडित मुलीच्या आईने कुर्ला पोलीस ठाण्यात आरोपी रशीद विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून कुर्ला पोलीस ठाण्यात रशीद विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप रशीदला अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खोत यांनी दिली.