नाशिक Nashik News : प्लास्टिक नावाचा राक्षस पर्यावरणाचा झपाट्याने ऱ्हास करतोय. सरकार तसंच स्वयंसेवी संघटनांकडून याविषयी जनजागृतीही करण्यात येते. मात्र याचा म्हणावा तसा परिणाम होताना दिसत नाही. आपल्या पर्यावरणाचं रक्षण ही आपली जबाबदारी आहे, या भावनेनं जोपर्यंत सान-थोर काम करत नाहीत, तोपर्यंत ही परिस्थिती 'जैसे थे'च राहणार, या सामाजिक भानातून नाशिकमधली एक महिला झटतेय. वय वर्ष फक्त सत्तरीपार! पर्यावरणासाठी घातक असलेल्या प्लास्टिकचा वापर नागरीकांनी करू नये, यासाठी नाशिकच्या आजीबाईं गेल्या पाच वर्षांपासून जागृती करत आहेत. स्वतःच्या हाताने कापडी पिशव्या शिवून सार्वजनिक ठिकाणी नागरीकांना त्याचं मोफत वाटप करत आहेत. मागील पाच वर्षात त्यांनी आतापर्यंत 12 हजारहुन अधिक पिशव्यांचे वाटप केलं आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टिक पिशवी विसरून कापडी पिशवी वापरण्यास लाज बाळगू नका, असा संदेश त्या कृतीतून देत आहेत.
12 हजार 500 कापडी पिशव्या वाटप : "पर्यावरण तुमच्या दारी, कापडी पिशवी तुमच्या घरी, मी विमल काशिनाथ स्वामी तुम्हाला संदेश देते". हा संदेश देत सत्तरीपार केलेल्या नाशिकच्या खुटवड नगर भागात राहणाऱ्या विमल स्वामी या आजीबाई तरुणांना लाजवेल अशा ऊर्जेने पर्यावरण संरक्षणासाठी काम करत आहेत. समाजात पर्यावरणाविषयी जनजागृती वाढीस लागावी. प्लॅस्टिक पिशव्यांची नागरिकांना झालेली सवय मोडावी आणि प्लास्टिक हद्दपार व्हावं असं विमल आजीबाईंना वाटतं. गेल्या पाच वर्षांमध्ये आजीबाईंनी तब्बल 12 हजार 500 कापडी पिशव्या, पाच हजार कापडी पाकिटे स्वखर्चाने तयार करून त्याचं मोफत वाटप केलं आहे. तसेच 70 प्रकारच्या बी बियाणांपासून तयार केलेल्या 7 हजारपेक्षा अधिक राख्यांचं त्यांनी वाटप केलं आहे. केवळ चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या या आजीबाई उतरत्या वयातसुद्धा पर्यावरण विषयाची त्यांची असलेली आत्मीयेता सर्वांनाच प्रेरणादायी देणारे ठरणारी आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी आवाहन : पाच वर्षांपूर्वी घरी लग्नकार्यात नातेवाईकांनी आहेर म्हणून दिलेल्या नव्या कोऱ्या साड्या, शर्ट पीस, पॅन्ट पीस घरामध्ये मोठ्या प्रमाणत होतं. या कपड्यांचा काय वापर करावा हे मला समजतं नव्हतं. या कपड्यांपासून दिवसातून अनेक तास काम करत आकर्षक पद्धतीने कापडी पिशव्या तयार करण्यास सुरूवात केली. या पिशव्या नातेवाईक, लग्न सोहळ्यातमध्ये वाटू लागले. सुरुवातीला माझ्या पतीने यावर आक्षेप घेतला. पण मी माझे काम सुरूच ठेवलं. यात मला माझी सून आणि मुलगा हे मदत करतात. पिशव्या शिवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य दोरा, रोलर, चेन ते मला आणून देतात. आतापर्यंत सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांमध्ये शहरातील मुख्य बाजारात, मंदिरामध्ये, शाळेमध्ये जात मी कापडी पिशव्या लोकांच्या हाती देत पर्यावरणासंवर्धनासाठी आवाहन करत आहे. समाजाच्या चांगल्या कामासाठी माझ्याकडून हातभार लावत असल्यानं, त्याचा मला समाधान आहे." हे बोलत असताना त्यांच्या शब्दा-शब्दातून समाधान पाझरत असतं.
प्लस्टिक बंदी व्हावी : "आईंचं कार्य खूप कौतुकास्पद आहे. तिने पाच वर्षांत आतापर्यंत 12 हजार 500 कापडी पिशव्यांचं वाटप केलं आहे. त्यांच्या या सामाजिक कार्यात आम्हीदेखील त्यांना मदत करतो. या वयात देखील त्यांचा उत्साह बघून आम्हाला देखील उत्साह येतो. त्याचा एकच हेतू आहे की, सगळ्यांनी कापडी पिशव्या वापराव्यात आणि प्लास्टिकला बंदी करावी," असं आवाहन आजींची सून शर्मिला वसमतकर आवर्जून करतात.
हेही वाचा -