मुंबई : दादरच्या कोहिनूर स्क्वेअर येथील पार्किंग एरियातून बीएमडब्ल्यू कार चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलाय. रोहन फिरोज खान असं कार मालकाचं नाव आहे.
नेमकं काय घडलं? : रोहन खान या बांधकाम व्यावसायिकानं आपली लाल रंगाची BMW कार नोंदणी क्रमांक HP-52-D-1555 रविवारी 27 ऑक्टोबर रोजी दादर येथील कोहिनूर बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये दुपारी 1:00 वाजता पार्क केली होती. रोहन यांनी आपल्या कारची चावी पार्किंग अटेंडंटला दिली. त्यानंतर ते आपल्या दोन मित्रांसह 48 व्या मजल्यावर असलेल्या 'बॅस्टिन हॉटेल'मध्ये गेले. बॅस्टिन हॉटेल मधून निघाल्यानंतर रोहन खान यांनी पार्किंग अटेंडंटला त्यांची कार आणण्यास सांगितली. पण बराच वेळ अटेंडंट कार घेऊन न आल्यानं रोहन आणि त्यांच्या मित्रांची चिंता वाढली. रोहन यांनी पार्किंग व्यवस्थापन करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडं याबद्दल चौकशी केली असता, कार पार्क केलेल्या जागेवर नसल्याचं आढळलं.
सीसीटीव्ही फुटेज आले समोर : नजिकच्या परिसरात शोध घेऊनही कार न सापडल्यानं रोहन खान यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर रोहन खान यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन शिवाजी पार्क पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला. तर यासंदर्भात एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, "आम्ही या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. ही तपासणी केल्यावर, एका अज्ञात व्यक्तीनं दुपारी 2:00 वाजेच्या सुमारास बीएमडब्ल्यू कारची चोरी केल्याचं आमच्या निदर्शनास आलं. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे."
हेही वाचा -
- मोबाईल टॉवरमधील 'आझना कार्ड' चोरणाऱ्या टोळीला अटक, चीनसह हाँगकाँगमध्ये करायचे विक्री - Mira Bhayandar Crime News
- मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शिकेच्या घरी चोरी, आरोपीच्या मुसक्या आवळल्या - The money was stolen
- शोरुम फोडण्यापूर्वी 'भगदाड गँग' काय करायची? पोलिसांना चकवा देण्याकरिता चक्रावून जाणारे कारनामे - Thane Crime News