मुंबई Ganeshotsav 2024 : भक्तांच्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईत बाप्पाच्या स्वागताच्या तयारीला सुरुवात झाली. दुसरीकडं बृहन्मुंबई महानगरपालिकेनं गणपती विसर्जनाची तयारी केली असून, दीड दिवसांच्या तसेच सात दिवसांच्या घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी महानगरपालिकेनं चौपाट्या, नैसर्गिक तलाव आणि कृत्रिम तलाव सज्ज ठेवली आहेत. या सर्व तयारीची महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी स्वतः पाहणी केली. या संपूर्ण तयारीचा आढावा त्यांनी घेतला. सात तारखेला बाप्पा विराजमान होतील. त्यानंतर दीड दिवसांच्या गणपतीचं लगेच विसर्जन होईल. या दीड दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नेमकी काय तयारी आहे, याची पाहणी स्वतः आयुक्तांनी केल्याची माहिती महापालिका प्रशासनानं दिली आहे.
महापालिका आयुक्तांनी जुहू, वर्सोवा चौपाट्यांची केली पाहणी : मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबईतील जुहू, वर्सोवा यासह अन्य महत्त्वाच्या समुद्रकिनाऱ्यांना भेटी दिल्याची माहिती पालिकेनं दिली आहे. या आढावा दौऱ्यात आयुक्त भूषण गगराणी यांनी समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छतेची आणि गणपती विसर्जनाच्या दृष्टीनं काय तयारी आहे, याची पाहणी केली. या पाहणी दौऱ्या दरम्यान आयुक्तांनी मुंबईतील रस्ते सुस्थितीत आणि सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ ठेवण्याच्या सूचना देखील कर्मचाऱ्यांना दिल्या. गणेशोत्सवादरम्यान भाविकांची आणि नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी त्यांनी कामगार, कर्मचारी आणि महापालिका अधिकाऱ्यांना संपूर्ण उत्सवादरम्यान अत्यंत सक्रिय आणि सतर्क राहण्याचे निर्देश देखील दिल्याची माहिती पालिकेनं दिली आहे.
धोकादायक पुलांची नावं आधीच केली जाहीर : या संपूर्ण पाहणी दौऱ्यानंतर आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, "तपासणी करताना स्थानिक रहिवासी, स्वच्छ्ता कर्मचारी, विभागीय पालिका अधिकारी आणि चौपाट्यांवरील लाईफ गार्ड यांच्याशी बातचीत केली. यंदाच्या गणेशोत्सवाच्या तयारीत महापालिका व्यस्त आहे. यात खड्ड्यांची दुरुस्ती, गणेश विसर्जन मार्गांची देखभाल आणि झाडांची छाटणी या कामांचा समावेश आहे. ज्या मार्गावरून गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जन मार्गावर विशेष लक्ष दिलं जात आहे. धोकादायक पुलांची नावं पालिकेनं आधीच जाहीर केली असून वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलिसांना देखील सहकार्य करणं अत्यंत आवश्यक आहे." अशी प्रतिक्रिया आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे.
हेही वाचा :
- कोकणातील चाकरमान्यांना गणपती 'बाप्पा पावला'; राज्य सरकारनं केली मोठी घोषणा - Ganeshotsav 2024
- गणेशोत्सव 2024; महापालिकेची मुंबईकरांना भेट, यावर्षी करणार 204 कृत्रिम तलावांची निर्मिती - Ganeshotsav 2024
- काय सांगता! एकाच मिनिटात कोकणात जाणाऱ्या गणपती स्पेशल ट्रेनचं तिकीट बुकिंग फुल्ल; चाकरमानी संतप्त - Ganpati Special Trains