अमरावती Blind Mala Success In MPSC : दोन दिवसांपूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागला. मंत्रालयात लिपिक पदासाठी दिलेली परीक्षा तिनं उत्तीर्ण केली. ती सर्वसाधारण युवती नाही, तर नियतीनं घेतलेल्या अतिशय कठीण परीक्षेचा सामना करत माला पापळकरनं आज नेत्र दीपक यश मिळवलं आहे. जन्मत:च दिव्यांग असलेल्या मालाला (Mala Papalkar) तिच्या जन्मदात्यांनी जळगाव येथील रेल्वे स्थानकाच्या कचरा पेटीत टाकले होते.
शंकर बाबा पापळकरांच्या आश्रमात आनंदोत्सव : वझर येथील शंकर बाबा पापळकरांच्या दिवंगत अंबादास पंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहात शंकरबाबा पापळकर यांना पद्मश्री मिळाल्याचा आनंद उत्सव साजरा होत असताना, माला पापळकर हिनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या लिपिक गट क मुख्य परीक्षेत यश मिळवल्याचा आनंद देखील साजरा होत आहे. येथे प्रत्येक जण आनंदानं भारावला आहे. आपल्याला संधी मिळत नाही, साधनांचा अभाव आहे, असं रडगाणं गाणाऱ्या अनेक युवकांसाठी माला पापळकरचा आदर्श खरोखरच प्रेरणादायी आहे.
ती सापडली कचरापेटीत : आपले आई-वडील कोण हे माहिती नाही, जवळपास दीडशे बेवारस आणि मतिमंद मुलांसोबत लहानाची मोठी झालेली माला ही जळगाव रेल्वे स्थानकावर 25 वर्षांपूर्वी एका कचरापेटीमध्ये पोलिसांना सापडली होती. पोलिसांनी तिच्या आई-वडिलांचा शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत. जळगावला दिव्यांगांच्या पुनर्वसनाची कुठलीही व्यवस्था नसल्यानं बालकल्याण समितीच्या आदेशानुसार पोलिसांनी तिला वझर येथील दिवंगत अंबादास पंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहाचे संचालक शंकर बाबा पापळकर यांच्या स्वाधीन केलं होतं. शंकर बाबा पापळकर यांनी तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारून तिचे माला असं नाव ठेवून तिला स्वतःचे नाव दिले. माला शंकरराव पापळकर या नावानं तिचं आधार कार्ड, निवडणूक कार्ड, रहिवासी दाखला आदी कागदपत्र तयार करुन तिच्या शिक्षणाची व्यवस्था केली.
शिक्षणाची लहानपणापासून जिद्द : मालाला लहानपणीपासूनच शिकायची, पुस्तक वाचायची आवड निर्माण झाली होती. जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर ती शिकत गेली. अमरावती येथील डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय येथून दहावी आणि बारावी उत्तीर्ण केल्यावर अमरावती येथील विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था येथून तिनं कला शाखेची पदवी परीक्षा 2018 मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. मालाच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी दर्यापूर येथील प्राध्यापक प्रकाश टोपले यांनी तिचं पालकत्व स्वीकारलं आणि तिला शिक्षणासाठी संपूर्ण मदत केली. 2019 मध्ये मला स्पर्धा परीक्षेकडं वळली. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करण्याची धडपड तिची सुरू झाली असताना, अमरावती शहरातील युनिक अकॅडमीचे संचालक अमोल पाटील यांनी तिला अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलं.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा मला फार आनंद होत आहे. मी मात्र एवढ्यावरच थांबणारी नाही, आता केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा मला द्यायची आहे. पद्मश्री शंकर बाबा पापळकर यांचं नाव मला मोठं करायचं आहे. मला लहानपणीपासूनच नवीन काहीतरी जाणून घ्यायची आवड होती. ब्रेल लिपीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तयारीसाठी पुस्तक उपलब्ध नव्हती. यामुळं प्राध्यापक अमोल पाटील यांनी ऑडिओ कॅसेटच्या माध्यमातून माझी तयारी करून घेतली. - माला शंकर पापळकर, दिव्यांग युवती
विलक्षण प्रतिभेची धनी : आजवर मी अनेक विद्यार्थी घडवले आहेत. माला मात्र, माझ्यासाठी फार मोठं आव्हान होतं. खरंतर शंकर बाबा पापळकर यांनी दिलेलं हे आव्हान माझ्यासाठीच मोठी परीक्षा होती. मात्र खरं सांगायचं तर मालाला देवानंच असामान्य गुणांनी समृद्ध बनविलं आहे. मालाच्या चिकाटी आणि परिश्रमावर माझा विश्वास होता, असं मालाला मार्गदर्शन करणारे युनिक अकॅडमीचे संचालक अमोल पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
मालाच्या यशानं इतिहास रचला : "माला ही 100 टक्के दृष्टीहीन असल्यामुळं तिला टंख लेखनातून सूट देण्यात आली. तसेच लेखी परीक्षेचा पेपर वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असल्यानं आयोगानं तिला रायटर घेण्याची परवानगी दिली. गुरुवारी सायंकाळी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात मालानं यश संपादन केल्याचं दिसताच मी शंकर बाबांना सर्वात आधी फोन करून ही आनंदाची बातमी दिली आणि त्यांचं अभिनंदन केलं. खरंतर मालाच्या या यशामुळं शंकर बाबा पापळकरांच्या अपंग पुनर्वसनाच्या क्षेत्रात संपूर्ण देशात नवा इतिहास रचला गेला," असं अमोल पाटील म्हणाले.
पद्मश्री पुरस्काराच्या आनंदापेक्षाही मालाच्या यशाचा अभिमान : "बेवारस स्थितीत कचऱ्याच्या पेटीत सापडलेल्या अंध मालानं जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर आज मोठं यश मिळवलं आहे. पद्मश्री पुरस्कार मिळाल्याचा आनंद मला आहेच, मात्र त्यापेक्षाही मालाचा अभिमान मला अधिक वाटतो. महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील दिव्यांगांच्या पुनर्वसनाच्या इतिहासातील ही घटना सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल," अशी भावनिक प्रतिक्रिया शंकर बाबा पापळकर यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केली. अनेक मुलं त्यांच्या आई-वडिलांजवळ सर्व सोयी सुविधांसह राहतात. असं असताना देखील आमची माला अतिशय विपरीत परिस्थितीत अभ्यास करुन अधिकारी झाली. इतके हजारो विद्यार्थी परीक्षेला बसले असताना मालानं मोठं यश खेचून आणलं, ही खरोखरच आनंदाची बाब असल्याचं देखील शंकर बाबा पापळकर म्हणाले.
मालाचा सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार : माला पापळकर हिचा सोमवारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. विशेष म्हणजे रविवारी माला हिला सौरभ कटियार यांच्या निवासस्थानी खास पाहुणचारासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं.
हेही वाचा -