नवी दिल्ली BJP Second List Lok Sabha : भारतीय जनता पार्टीने आपली लोकसभेची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावं आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं तिकीट कापलं जाईल अशी जोरदार चर्चा होती. मात्र, गडकरींना तिकीट देण्यात आलं आहे. तर, अनेक ठिकाणी विद्यमान खासदारांची नावं कापण्यात आली आहेत. तसंच, अखेर पंकजा मुंडे यांचा पाच वर्षांचा वनवास संपला असून भाजपाने पंकजा यांना बीडमधून लोकसभेचं (Lok Sabha Election) तिकीट दिलं आहे.
अनेक दिग्गज नेत्यांना पुन्हा उमेदवारी : भाजपाकडील एकूण ४० जणांच्या आजच्या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावं (20 candidates from Maharashtra) जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर, गेली अनेक दिवसांपासून निवडणुकांपासून दूर असलेल्या किंवा ठेवल्या गेलेल्या भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना बीडमधून प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करून उमेदवारी देण्यात आली आहे. तसंच, आपल्याला उमेदवारी देऊ नये यासाठी मोठे प्रयत्न करणारे सुधीर मुनगंटीवार यांनाही चंद्रपूरमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
पंकजा मुंडेंचा वनवास संपला : गेल्या अनेक दिवसांपासून माजी आमदार आणि भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना राज्याच्या राजकारणातून दूर केल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. पंकजा यांना राष्ट्रीय सरचिटणीसपद देऊन राष्ट्रीय नेत्या म्हणून त्या केंद्रातील जबाबदारी सांभाळत असल्याचं राज्यातील नेत्यांकडून सांगितलं जात होतं. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून पंकजा यांना दूर ठेवलं गेलं अशी चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कायम होती. तसंच, विधानसभा, राज्यसभा निवडणुकीतही पंकजा यांना स्थान न दिल्याने पंकजा यांनी आता वेगळा निर्णय घ्यावा असा सूर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होता. तसंच, मधे-मध्ये पंकजाही आपली खदखद बोलून दाखवत होत्या. नुकतंच त्या एका कार्यक्रमात बोलताना बस झालं आता 5 वर्षांचा वनवास असं म्हणाल्या होत्या. दरम्यान, आज जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीत पंकजा यांचं बीड लोकसभेसाठी नाव जाहीर झाल्याने त्यांचा हा 5 वर्षांचा वनवास संपला अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
भाजपाचा बालेकिल्ला : जळगाव मतदारसंघात भाजपाने धक्कातंत्रचा अवलंब केला आहे. जळगावात भाजपाने विद्यामान खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट कापलं आहे. या ऐवजी माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. स्मिता वाघ भाजपाच्या विधान परिषदेच्यादेखील आमदार होत्या. त्या भाजपाचे दिवंगत नेते उदय वाघ यांच्या पत्नी आहेत. स्मिता वाघ यांच्याकडे जळगावात आदराने पाहिलं जातं. त्यांचा समर्थक वर्ग मोठा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपाला त्याचा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो.
पहिली यादी : भाजपने पहिल्या यादीत उत्तर प्रदेश 51, पश्चिम बंगाल 20, मध्य प्रदेश 24, गुजरात 15, राजस्थान 15, केरळ 12, तेलंगणा 9, आसाम 11, झारखंड 11, छत्तीसगड 11, दिल्ली 5, जम्मू कश्मीर 2, उत्तराखंड 3, अरुणाचल प्रदेश 2, गोवा 1, त्रिपुरा 1, अंदमान निकोबार 1, दमन दीव 1 अशा एकूण 195 जागांचे उमेदवार भाजपने जाहीर केले होते. या यादीत 34 केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री यांचाही समावेश होता. त्यात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाचाही समावेश होता. या यादीत 27 अनुसूचित जाती आणि 18 एसटी उमेदवार आहेत. 195 पैकी 57 ओबीसी उमेदवार उभे करण्यात आले आहेत.
भाजपच्या 72 जागांची दुसरी यादी खालील प्रमाणे
- गुजरात - ७
- दिल्ली - २
- हरियाणा - ६
- हिमाचल प्रदेश - २
- कर्नाटक - २०
- उत्तराखंड - २
- महाराष्ट्र - २०
- तेलंगाना - ६
- त्रिपुरा - १
भाजपाने जाहीर केलेले महाराष्ट्रातील उमेदवार
- १) चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
- २) रावेर - रक्षा खडसे
- ३) जालना- रावसाहेब दानवे
- ४) बीड - पंकजा मुंडे
- ५) पुणे - मुरलीधर मोहोळ
- ६) सांगली - संजयकाका पाटील
- ७) माढा - रणजीत निंबाळकर
- ८) धुळे - सुभाष भामरे
- ९) उत्तर मुंबई - पियुष गोयल
- १०) उत्तर पूर्व मुंबई - मिहीर कोटेचा
- ११) नांदेड - प्रतापराव चिखलीकर
- १२) अहमदनगर- सुजय विखे पाटील
- १३) लातूर- सुधाकर श्रृंगारे
- १४) जळगाव - स्मिता वाघ
- १५) दिंडोरी- भारत पवार
- १६) भिवंडी - कपिल पाटील
- १७) वर्धा - रामदास तडस
- १८) नागपूर- नितीन गडकरी
- १९) अकोला- अनुप धोत्रे
- २०) नंदुरबार- डॉ. हिना गावित
हेही वाचा :