मुंबई- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे संकल्पपत्र प्रकाशित करण्यात आले. यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, " हे संकल्पपत्र म्हणजे विकसित भारताकरता रोड मॅप आहे. २०१४ च्या निवडणुकीनंतर आम्ही २०१९ च्या निवडणुकीला समोर जात असताना कुठल्या कुठल्या गोष्टी पूर्ण केल्या ते लोकांना सांगितल्या आहेत."
महाविकास आघाडीचा आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी टीका करताना म्हटले, "आज १२ वाजता स्थगितीपत्रसुद्धा जारी होणार आहे. ज्यांना केवळ चालणाऱ्या प्रोजेक्टला स्थगिती देण्यात रस आहे, त्यांचे घोषणापत्र आज येणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास महायुतीवर आहे."
एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था पार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असणार आहे. २०२९ च्या निवडणुकीला सामोरे जाताना या संकल्पपत्रासोबत एक रिपोर्टसुद्धा देणार आहोत-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, "महाराष्ट्रात अनेक गोष्टींना सुरुवात झाली. गुलामगिरीतून मुक्तीचं आंदोलनसुद्धा शिवाजी महाराजांनी इथूनच सुरू केलं. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा काश्मीरमध्ये निवडणूक झाली. ३७० कलम हटल्यानंतर पहिल्यांदा काश्मीरमध्ये भारताच्या संविधानाची शपथ घेऊन काम करण्याचे कार्य झालं. मजबूत आणि सुरक्षित महाराष्ट्र कसा होईल, याच्यासाठी खास योजना संकल्प पत्रात आहेत."
उद्धव ठाकरेंना एक विनंती... पुढे अमित शाह म्हणाले,"आमचा मुकाबला महाविकास आघाडीबरोबर आहे. परंतु महाराष्ट्राच्या संस्कृतीबरोबर छळ करून फक्त सत्तेवर राहण्याची त्यांची विचारधारा आहे. मी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करेन, तुम्ही सतत तिसऱ्यांदा आम्हाला जनाधार द्या. २०१४ साली तुम्ही आम्हाला जनाधार दिला. २०१९ मध्ये तुम्ही आम्हाला पुन्हा जनाधार दिला. परंतु काहींनी यामध्ये खो घातला. जनादेशासोबत द्रोह करून सरकार स्थापन करण्यात आलं. काँग्रेसचा कुणी नेता सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या संबंधित दोन चांगले शब्द बोलू शकतो का? काँग्रेसचा कोणी नेता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत दोन चांगले शब्द बोलू शकतो का? उद्धव ठाकरे हे राहुल गांधींना याबाबत विनंती करतील का? या देशातून तिहेरी तलाक निघून जाईल, साडेपाचशे वर्षानंतर या भूमीत राममंदिर उभारलं जाईल, असं कुणाला कधी वाटल होत का?"
ज्या संविधानाची प्रत घेऊन राहुल गांधीनी संसदेत शपथ घेतली, ती प्रत पूर्णपणे कोरी होती. एससी, एसटी, ओबीसी यांचे आरक्षण घेऊन मुसलमानांना आरक्षण देण्याच्या काँग्रेसची विचारधारा आहे-केंद्रीय गृहमंत्री, अमित शाह
महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक- "महाराष्ट्रात गुंतवणूक येत नाही, असा विरोधकांकडून प्रचार करत आहेत. आघाडीचं सरकार काही काळासाठी असताना महाराष्ट्रात गुंतवणुकीत मागे होता. एफडीआयमध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर गेला होता. परंतु आमचं सरकार आल्यानंतर दोन वर्षात सर्वात जास्त एफडीआय कुठल्या राज्यात आला असेल तर तो महाराष्ट्रमध्ये आला आहे," असा दावा केंद्रीय गृहमंत्र्यांनी केला.
उद्धव ठाकरे तुम्ही कुठे बसला आहात?केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, " उद्धव ठाकरे तुम्ही कुठे बसायचं आहे, हे तुम्ही ठरवायचं आहे. पण, तुम्हाला आता आठवण करून देत आहोत, तुम्ही कुठे बसले आहात. ३७० हटविण्याला विरोध करणारे, राममंदिराला विरोध करणारे, छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध करणारे, सावकरांविरोधात अपशब्द वापरणारे आणि वक्फ बोर्डा विधेयकाच्या दुरुस्तीला विरोध करणारे यांच्याबरोबर तुम्ही बसले आहात.
- "सत्तेत असताना तुम्ही दहा वर्षे काय केली, असा प्रश्न शरद पवार यांना विचारत आहे. शरद पवारांकडून नकली जनादेश घेण्याचा प्रयत्न आहे, असा आरोपदेखील केंद्रीय गृहमंत्र्यांनी केला.
लाडकी बहीण योजना आता 'लाडली'- निवडणुकीनंतर महायुतीमधून कोण मुख्यमंत्री होणार, याचे उत्तरदेखील अमित शाह यांनी दिले. ते म्हणाले, "महाराष्ट्रात आताच्या घडीला एकनाथ शिंदे महायुतीचे नेतृत्व करत आहेत. निवडणुकीनंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसून मुख्यमंत्री पदावर चर्चा करणार आहोत. परंतु आम्ही शरद पवार यांना ही संधी देणार नाही. आरक्षण हटवले जाईल हा मुद्दा आता जनतेला माहित झाला आहे. काँग्रेसचे सरकार असताना केंद्रातील सर्व परीक्षा व्यवस्थेत मागासवर्गाला आरक्षण दिलं जात नव्हतं. धर्मांतराविरोधात आम्ही कठोरातील कठोर कायदा आणणार आहोत. महाराष्ट्रातील जनता हिमाचल, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये सुद्धा आहेत. त्यांना विचारा की कशा पद्धतीने तिकडे अव्यवस्था आहे. लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिला भगिनींसाठी आता 'लाडली' झाली आहे. विरोधकांना हे माहित पडलं आहे, म्हणून ते त्याचा विरोध करत आहेत."
महायुतीच्या संकल्प पत्रातील प्रमुख १० आश्वासने
- लाडकी बहीण योजनेची रक्कम १५०० रुपयांवरून प्रति महिना २१०० रुपये करणार
- शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ करून एमएसपी वर २० टक्के सबसिडी देणार
- ज्येष्ठ नागरिकांचे निवृत्तीवेतन १५०० रुपयांऐवजी २१०० करणार
- पोलीस विभागात २५ हजार हजार महिला पोलिसांची भरती करणार
- शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत रक्कम १२ हजार रुपयांवरून १५ हजार रुपये करणार
- गरजू व्यक्तींना अन्न आणि निवारा देण्याचं आश्वासन
- ४५ हजार गावांमध्ये रस्ते बांधणीचे आश्वासन सौर उर्जेवर भर देत वीज बिलात ३० टक्के कपात करणार
- अंगणवाडी आणि आशा सेविकांचं मासिक मानधन १५ हजार रुपये करण्यासोबत त्यांना आरोग्य आणि सुरक्षा कवच देणार
- १० लाख विद्यार्थ्यांना महिन्याला दहा हजार रुपये शिक्षण शुल्क देणार. २५ लाख नोकऱ्या उपलब्ध करणार
- जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यात येतील.
हेही वाचा-