पुणे BJP showed black flags Ajit Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जनसन्मान यात्रा सुरू आहे. त्यांची ही यात्र आज जुन्नरला पोहोचलीय. मात्र, अजित पवार यांना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. आज जुन्नरमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत अजित पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी केलीय. त्यामुळं संपूर्ण राज्यात महायुतीमधील अंतर्गत वादाची चर्चा सुरू झाली आहे. खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या चार तालुक्याच्या विधानसभा मतदारसंघात जनसन्मान यात्रा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी : अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुचके यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली. शासकीय कार्यक्रम असताना घटक पक्षांना बगल दिली जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. घटक पक्षांना बाजूला सारून अजित पवार पालकत्वाची भूमिका पाळत नसल्याबद्दल भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केलीय.
कार्यक्रमस्थळी तणाव : जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका असल्यानं पर्यटन वाढीशी संबंधित योजनाची आज सकाळी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अजित पवार घटक पक्षानं मान देत नसल्याचा आरोप भाजपाच्या नेत्या आशा बुचके यांनी केला. त्यामुळे त्यांनी यात्रेला काळे झेंडे दाखवून निषेध केला. त्यांच्यासोबत महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. त्यामुळं कार्यक्रमस्थळी तणाव निर्माण झाला होता. "सुमारे दोन तास चाललेल्या या जनसन्मान यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांनाच मान दिला जातो. महायुतीतील इतर घटक पक्षांचा विचार केला जात नाही," असा आरोप बुचके यांनी केला. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण द्यावं : उत्तर पुणे जिल्ह्यात जनसन्मान यात्रेदरम्यान घडामोडी घडल्यामुळं महायुतीत काहीच आलबेल नसल्याचं स्पष्ट होतंय. एकीकडं आंबेगावमध्ये शिवसेनेनं बैठकीवर बहिष्कार घातला. तर दुसरीकडं जुन्नरमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत निदर्शनं केली. यासंदर्भात अमोल मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टीकरण देण्याचं आवाहन केलंय. तर जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रक्तदाब कमी झाल्यानं आशा बुचके यांना अचानक चक्कर आली. त्यामुळं त्यांना नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.
का काढली जनसन्मान यात्रा? : उत्तर पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता. इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता निर्विवाद होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यामुळं येथील राजकारणाला कलाटणी मिळाली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवारांना म्हणावं, तसं यश मिळालं नाही. माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झालाय. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं जनसन्मान यात्रेतून मतदारसंघावर लक्ष्य केंद्रित केलं आहे.
'हे' वाचंलत का :
- "...तर लाडकी बहीण योजनेचे पैसे दुप्पट होणार", मुख्यमंत्री शिंदेंचं लाडक्या बहिणींना आश्वासन - Ladki Bahin Yojana
- "अनिल देशमुख आणि मी नागपूरमुळंच..."; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा - Sanjay Raut
- गेल्या दोन वर्षात राज्यात शिंदेंचं इंजिन दुप्पट वेगानं धावलं; ठाकरेंपेक्षा दुप्पट फाईल्सचा निपटारा तर तिप्पट कामांना मंजुरी - Maharashtra CM Sign Files