बीड : पुण्यामध्ये भाजपा आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच बीडच्या केजमध्ये अपहरण करून हत्या करण्यात आली. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचाचं भर दुपारी रस्त्यावरुन अपहरण करण्यात आलं. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेमुळं बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाल्याचं बघायला मिळतंय. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
नेमकं काय घडलं? : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख आणि त्यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख केज हून मस्साजोगच्या दिशेनं जात असताना डोणगाव फाट्याजवळ सहा अनोळखी व्यक्तींनी त्यांची गाडी थांबवली. त्यांनी सरपंचांना मारहाण केली. त्यानंतर त्यांचं अपहरण करण्यात आलं. शिवराज यांनी घडलेल्या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांनी कळवली. पोलिसांच्या दोन पथकांनी संतोष देशमुख यांचा तपास सुरू केला. त्यानंतर केज ते नांदूर घाट रस्त्यावर दहीटना फाटा येथे संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला. मृताच्या अंगावर मारहाणीचे आणि शस्त्राचे वार आहेत. पोलीसांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय केज येथे आणला. घटनेची माहिती मिळताच मस्साजोग येथील नागरिक मोठ्या प्रमाणात पोलीस ठाणे आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात जमा झाले होते. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी जादा कुमक मागविली होती.
जुन्या भांडणाची कुरापत? : जुन्या भांडणाची कुरापत काढून हा खून झाल्याचा आरोप मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ शिवराज देशमुख केलाय. सुदर्शन घुले यांनी 6 डिसेंबर रोजी मस्साजोग येथे अवादा पवन ऊर्जा या पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. त्या प्रकल्पावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेले मस्साजोग येथील असल्यानं सरपंच संतोष देशमुख यांनी त्यात हस्तक्षेप केला. मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली होती.
आरोपींना तत्काळ अटक करावी-खून प्रकरणावर खासदार बजरंग सोनवणे यांनी दिल्लीतू प्रतिक्रिया दिली. आरोपींना अटक करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली. खासदार सोनवणे म्हणाले, "पोलीस अधीक्षकांनी माझा आणि पीएचा फोन उचलला नाही. खून प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी. पोलीस यंत्रणेकडून प्रतिसाद मिळत नाही. पवनचक्क्याच्या वादातून खंडणीतून हा प्रकार घडला आहे. या प्रकरणाला राजकीय वळण लावण्याचे कारण नाही. पण, राजकीय लोक गुन्हेगारांना पाठशी घालत आहेत. कुणाच्या वरदहस्तामुळे बीडचा बिहार होत आहे. या परिस्थितीवर पोलिसांनी नियंत्रण मिळून दोषींना अटक करावी". सरपंचाच्या हत्येचं प्रकरणावरून संसदेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचीही त्यांनी माहित दिली.
हेही वाचा -