पुणे Baramati Lok Sabha Results 2024 : केवळ देशातील नाही तर राज्यातील सर्वाधिक हाय व्होल्टेज असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. या मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी नणंद विरुद्ध भावजय लढत झाली. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून सुळे आघाडीवर असल्याचं बघायला मिळालं. तेराव्या फेरीपर्यंत सुप्रिया सुळे यांनी 66 हजार 464 मतं मिळाली. त्यामुळं सुप्रिया सुळे यांनी निर्णायक आघाडी घेतली होती. संपूर्ण मतमोजणीनंतर त्यांच्या विजयाची औपचारिक घोषणा आता झाली आहे. सुप्रिया सुळे यांना ७ लाख २८०६८ मते मिळाली. तर सुनेत्रा पवार यांना ५ लाख ७४ हजार ५३८ मते मिळाली आहेत. सुप्रिया सुळे १ लाख ५३ हजार ०४८ मतांनी विजयी झाल्यात.
बारामतीमधील सर्व मतदारांचे मी आभार मानते. या विजयानं जबाबदारी वाढली आहे. या विजयात आपण सर्व सहभागी झाला आहात. माझी लढाई वैचारिक होती. मी कधीही वयक्तिक टीका केली नाही. महागाई, बेरोजगारी असे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. तपास यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्या भाजपाला जनतेनं उत्तर दिलंय. NDA चा उमेदवार अशा अनुषंगानेच मी विरोधी उमेदवाराकडं बघत होते. माझ्यापेक्षा अजित पवार आणि सुनेत्रा पवार हे दोघेही मोठे आहेत. - सुप्रिया सुळे, विजयी उमेदवार
बारामतीचा इतिहास : बारामती लोकसभा मतदारसंघाकडं यंदा संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. आतापर्यंत पवार कुटुंबियांचं वर्चस्व या मतदार संघावर राहिलंय. 1984 ला शरद पवार यांनी भारतीय काँग्रेस (समाजवादी) पक्षाकडून पहिल्यांदा येथून निवडणूक जिंकली होती. त्यापूर्वी या जागेवर काँग्रेसचं वर्चस्व होतं. शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून 6 वेळा, तर त्यांची कन्या सुप्रिया सुळे या 3 वेळा आणि त्यांचे पुतणे अजित पवार एकदा खासदार झालेत.
बारामती लोकसभा मतदारसंघाची रचना : बारामती लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. त्यामध्ये बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर आणि खडकवासला यांचा समावेश आहे. 2019 च्या निवडणुकीमध्ये या जागेवर 21,14,716 मतदार होते. 1957 मध्ये इथं पहिली निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसचे केशवराव जेधे विजयी झाले होते. 1960 च्या पोटनिवडणुकीमध्ये आणि 1967 च्या निवडणुकीत काँग्रेसचे गुलाबराव जेधे खासदार म्हणून निवडून आले होते. 1971 च्या निवडणुकीत काँग्रेसचे आर के खाडीलकर आणि 1977 मध्ये जनता पक्षाचे संभाजीराव काकडे विजयी झाले होते. 1980 मध्ये काँग्रेसनं पुन्हा ही जागा काबीज केली. त्यानंतर शंकरराव बाजीराव पाटील खासदार झाले.
हेही वाचा -
- महात्मा गांधींची कर्मभूमी असलेल्या वर्ध्यात कोण मारणार बाजी? - Lok Sabha Election Result 2024
- नागपूर, रामटेक मतदारसंघात कोण मारणार बाजी? नितीन गडकरी मोठ्या मतांनी आघाडीवर - Lok Sabha Election Result 2024
- एनडीएला सत्ता मिळणार का? महाराष्ट्रासह 'या' चार राज्यांतील निकालावरून ठरणार राजकीय समीकरणे - lok sabha election results 2024