छत्रपती संभाजीनगर Ambadas Danve : राज्यातील शाळा दोन दिवसांमध्ये सुरू होणार आहेत. त्यापूर्वी विधान परिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी सरकारी बँकांची शाळा घेतली. शेतकरी बांधवांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांना जाब विचारण्यात आला. जिल्ह्यात एकाच वेळी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेतंर्गत संभाजीनगर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या विभागीय कार्यालयात जाऊन पीक कर्ज प्रकरणाची माहिती घेतली. तसंच संपूर्ण जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एकूण 117 बँकेसमोर आंदोलन करून बँक व्यवस्थापकांना जाब विचारण्यात आला.
बँकांना दिला इशारा : महाराष्ट्र राज्य विधानपरिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं पिक कर्ज नाकारणाऱ्या 117 बँकांची एकाच वेळी शाळा घेण्यात आली. पावसाळा सुरू झाला असून शेतकऱ्यांना कर्जाची गरज निर्माण होईल. त्यावेळी त्यांची अडवणूक करू नका. प्रत्येक ठिकाणी असलेले स्थानिक पदाधिकारी त्याकडं लक्ष ठेवतील. शेतकऱ्यांना त्रास देण्यात आला, तर आम्ही जाब विचारू, असा इशारा यावेळी देण्यात आला. शेतकऱ्यांना पिक कर्जासाठी अडवणूक करु नका, शेतकऱ्यांचं दुष्काळग्रस्त अनुदान इतर अनुदानाच्या येणाऱ्या पैशांवर निर्बंध लावू नका, अशा सूचना केल्या संबंधित शाखा अधिकाऱ्यांना केल्या. तात्काळ सर्व प्रकरणे निकाली काढून शेतकऱ्यांना वेठीस धरून नका, अशा सुचना केल्या आहेत. बळीराजाच्या मदतीसाठी शिवसैनिक नेहमी तत्पर असून आगामी काळात प्रलंबित पीक कर्ज प्रकरणं तातडीनं मार्गी न लावल्यास शिवसेना पद्धतीनुसार आंदोलन केलं जाईल, असा इशारा यावेळी बँक व्यवस्थापकांना अंबादास दानवे यांनी दिला.
जरांगेंच्या आंदोलनाचा आदर करा : मनोज जरंगे पाटील यांचा आंदोलन स्थगित झालं आहे. त्याचा आदर केला पाहिजे. वाशीला सरकारनं गुलाल अंगावर घेऊन मराठा आरक्षणाबाबत एक सर्कुलर दिलं होतं, त्याचं पुढं काय झालं?. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं मराठा तरुणांच्या डोळ्यात धूळफेक केली का? हा मोठा प्रश्न आहे. जरांगे पाटील एक लढाऊ नेतृत्व आहे. म्हणून त्यांची भेट घेण्यासाठी गेलो. जरांगे पाटील यांच्या आंदोलनातलाठी चार्ज झाला होता. त्यावेळी सरकारनं गुन्हे मागे घेऊ असं सांगितलं होतं. मात्र सरकारनं गुन्हे मागे घेतले का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. बीडमध्ये होणारा जातीयवाद दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात जातीय सलोखा असायला पाहिजे. हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळं सर्वांना सोबत राहण्याची आवश्यकता आहे, असं दानवे म्हणाले.
मराठवाड्यात मराठा कुणबी हवा : जो लढा समाज लढतो त्या समाजाचा आपण आदर केला पाहिजे. कुणाच्या विरोधात आपण नसायला हवं, असं माझं मत आहे. मराठा आरक्षणाबाबत ओबीसी समाजाचा इथं मुद्दाच येत नाही. विदर्भात सर्व मराठी कुणबी ओबीसी आहे. उत्तर महाराष्ट्रात सर्व मराठी कुणबी आहे. मराठवाड्यात देखील सर्व मराठी कुणबी असायला हवे, अशी मागणी आहे. त्यामुळं ओबीसींनी मराठ्यांचं स्वागत केलं पाहीजे. सरकार फक्त राजकारण करत आहे. सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची वेगवेगळी भूमिका आहे. या भूमिकांमुळं मराठा समाजावर अन्याय अत्याचाराचा कळस वाढतो आहे, असा आरोप दानवे यांनी केला. तर चंद्रकांत खैरेंच्या पराभवाबाबत बोलताना ते म्हणाले, ते ज्येष्ठ नेते आहेत. ज्येष्ठ नेत्यानं तक्रार केली असेल, तर मी तक्रारीनं उत्तर देणार नाही. कारण मी लहान आहे, अस म्हणत त्यांनी सावरासावर केली.
'हे' वाचलंत का :