मुंबई Badlapur Girls Sexually Assaulted : बदलापूर येथील एका शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ बदलापूर रेल्वे स्थानकात सकाळपासून नागरिक जोरदार आंदोलन करतायेत. त्यामुळं कर्जत ते कल्याण दरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. या संदर्भात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. या संदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
कठोर कारवाई करणार : याबाबत शाळा प्रशासनावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेत. यातील आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्याच्यावर ताबडतोब कारवाई करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. या आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यासंदर्भात सरकारनं पावलं उचलली असल्याचं मंत्री दीपक केसरकर म्हणाले.
शाळा मुख्याध्यापिका निलंबित : संबंधित शाळेत सीसीटीव्ही नसल्यानं हा प्रकार घडला असल्याचं समोर आलं, तर या प्रकरणी शाळेलाही नोटीस बजावण्यात आली. तसंच शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्यासह अन्य तीन जणांना निलंबित करण्यात आलंय. याबाबत शाळेत सावित्री समिती स्थापन करण्यासाठी आणि तक्रारपेटी ठेवण्यासाठी सूचना देण्यात आल्याचं मंत्री दीपक केसरकर म्हणाले.
पोलिसांवरही कारवाई : या प्रकरणातील अत्याचारग्रस्त मुलींना समुपदेशनाची गरज असल्यास त्यांना समुपदेशन देण्यात यावं. अन्य काही मदत लागत असेल तर ती मदतसुद्धा महिला आणि बालविकास विभागामार्फत देण्याचा आमचा प्रयत्न आहे. याशिवाय या दोन्ही मुलींना अन्य शाळांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्या प्रवेशासाठीसुद्धा आम्ही त्यांना मदत करणार आहोत, असं केसरकर यांनी सांगितलं. याप्रकरणी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही म्हणून तेथील पोलीस निरीक्षकावरही कारवाई करण्यात आली असल्याचं केसरकर यांनी स्पष्ट केलं.
शिक्षण मंत्र्यांनी दिल्या सूचना : अशा प्रकारच्या घटना कुठेही अन्य शाळांमध्ये घडू नयेत यासाठी प्रत्येक शाळेमध्ये तक्रार पेटी असावी. शाळांमध्ये सीसीटीव्ही असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर शाळांमध्ये सावित्री समिती स्थापन करण्यात येत आहे. ज्या शाळांमध्ये नसेल त्यांनी ती ताबडतोब स्थापन करावी. नववी ते कनिष्ठ महाविद्यालयातील मुलींची विशाखा समिती ही शाळा आणि महाविद्यालयात स्थापन झालीच पाहिजे. मुलींच्या सुरक्षेसाठी आणि संरक्षणासाठी जे जे करणे शक्य आहे ते राज्य शासन करेल, अशी ग्वाही शिक्षण मंत्र्यांनी यावेळी दिली.
हेही वाचा -