मुंबई (IANS) : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique Murder Case Update) यांच्या हत्या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. बाबा सिद्दिकी यांना गोळ्या झाडल्यानंतर शूटर शिवकुमार गौतम रुग्णालयात गेला आणि जवळपास 30 मिनिटं रुग्णालयाबाहेरच थांबला. मुंबई गुन्हे शाखेच्या चौकशीत त्यानं ही कबुली दिली आहे, अशी माहिती आयएएनएस वृत्तसंस्थेनं दिली आहे. त्यामध्ये पुढे म्हटलंय की, शिवकुमारनं खुलासा केलाय, "बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केल्यानंतर सिद्दीकी जिवंत आहेत की नाही याची पुष्टी करण्यासाठी तो लीलावती रुग्णालयात गेला होता."
तपासादरम्यान शिवकुमारनं सांगितलं की, तो बाबा सिद्दीकी यांच्या प्रकृतीची माहिती आजूबाजूच्या सूत्रांकडून गोळा करत होता. बाबा सिद्दीकी यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचं समजल्यानंतर तो तिथून निघून गेला. यानंतर आरोपी शूटर कुर्ला स्टेशनवर रिक्षा घेऊन गेला आणि त्यानंतर त्यानं लोकल ट्रेन पकडली. ट्रेनमध्ये प्रवास करत असताना त्याला एक फोन आला, ज्यामध्ये बाबा सिद्दीकी यांच्या निधनाची माहिती देण्यात आली.
शर्ट बदलून पुन्हा आता : जेव्हा शूटरला बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. तेव्हा त्यानं शर्ट बदलला आणि तो घटनास्थळी गेला. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला होता. या सर्व परिस्थितीवर त्यानं बारीक लक्ष ठेवलं होतं. जवळपास 30 मिनिटे तो या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून होता. यानंतर तो पुन्हा रुग्णालयात गेला, जेणेकरून त्याला आतील स्थिती जाणून घेता येईल. शिवकुमारनं सांगितलं की, बाबा सिद्दिकीची हत्या केल्यानंतर त्याचा प्लॅन उज्जैन रेल्वे स्टेशनवर धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंग यांना भेटण्याचा होता. यानंतर बिष्णोई गॅंगचे लोक त्याला वैष्णोदेवी मंदिरात घेऊन जाणार होते. त्यानंतर त्यानं लखनौला जाणारी ट्रेन पकडली. तेथून तो रोडवेजच्या बसनं बहराइचला रवाना झाला, अशी माहिती आयएएनएसच्या वृत्तात दिली आहे.
हेही वाचा -
- बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण; हत्येनंतर शर्ट बदलून घुसला गर्दीत, पुण्यात बदललं सीम कार्ड, शार्प शूटर शिवकुमारचे धक्कादायक खुलासे
- बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : मुंबई पोलिसांनी पंजाबमधून एका आरोपीला ठोकल्या बेड्या, रायगडमधून शस्त्र जप्त
- बाबा सिद्दीकी हत्याकांड : मारेकरी मेसेजिंग अॅपद्वारे होते अनमोल बिश्नोईच्या थेट संपर्कात, मुंबई पोलिसांचे धक्कादायक खुलासे