नंदुरबार : धडगाव तालुक्यातील सातपुड्यातील सर्वोच्च शिखरावर अश्वत्थामा ऋषी यात्रोत्सवाला सुरुवात झाली असून डोक्यावर कळस घेऊन आणि विविध प्रकारच्या वेशभूषा साकारत ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत आदिवासी बांधव अश्वत्थामा ज्याला स्थानिक लोक अस्तंबा ऋषी म्हणतात त्यांच्या दर्शनासाठी गुजरात मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील जवळच्या भागातून भाविक येत असतात. शेतकरी आपल्या शेतात पिकवलेलं नवं धान्य अस्तंबा ऋषीला नैवेद्य दाखवल्यानंतर धान्याच्या कापणीला आदिवासी बांधव सुरुवात करत असतात. या यात्रोत्सवाला नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात आणि मध्य प्रदेशातील हजारो तरुण पदयात्रा करत अस्तंबा ऋषींच्या दर्शनासाठी शिखरावर रवाना होत असतात. निसर्गरम्य वातावरणात असलेल्या अस्तंबा ऋषीच्या यात्रेचं भाविकांना मोठं आकर्षण असतं. यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे. समुद्री सपाटीपासून सुमारे 4 हजार फूट उंच शिखरावर अस्तंबा ऋषींचं देवस्थान आहे. भाविकांची अपारश्रद्धा असल्यानं हाती भगवा झेंडा घेत अस्तंबा ऋषींचा जय जयकार करत भाविक पदयात्रेला सुरुवात करत असतात. यंदा उंच शिखरावरून पाय घसरून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत धडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अस्तंबा ऋषींच्या यात्रोत्सवाला तीन राज्यातील भाविकांची हजेरी - सातपुड्यातील उंच शिखरात वसलेल्या अस्तंबा ऋषींच्या धनत्रयोदशीपासून यात्रेला प्रारंभ होत असतो. गुजरात मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील हजारो भाविक विशेषतः युवक यात्रा उत्सवात मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. अरुंद रस्ता, खोलदरीतून वाट काढत भाविक उंच शिखरावर अस्तंबा ऋषींच्या दर्शनासाठी येत असतात.
महाभारतातील अश्वत्थामा यांनी केली होती शिखरावर तपस्या - महाभारतातील गुरु द्रोणाचार्य यांचे पुत्र अश्वत्थामा यांनी सातपुड्यातील सर्वोच्च शिखरावर तपश्चर्या केल्याची आख्यायिका आहे. पूर्वजांनी सांगितलेल्या कथेनुसार आजही अश्वत्थामा सातपुड्यातच वसला आहे. म्हणून दीपोत्सवाच्या प्रारंभास धनत्रयोदशीपासून यात्रेस प्रारंभ होत असतो. समुद्रसपाटीपासून सुमारे 4 हजार फूट उंच डोंगरावर पायी चढून आदिवासी शेतकरी बांधव आपल्या शेतात पिकलेल्या धान्याचे नैवेद्य अस्तंबा ऋषी यांना देत असतात. या यात्रोत्सवात मोठ्या संख्येनं युवक वर्ग दर्शनासाठी येत असतो. सातपुड्यातील सर्वोच्च शिखर असलेल्या अश्वत्थामा ऋषी यात्रेत्सवात युवक डोक्यावर कळस घेऊन आणि विविध प्रकारच्या वेशभूषा साकारत ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत दर्शनासाठी जात असतात.
सर्वात उंच शिखरावरुन पाय घसरून तरुणाचा मृत्यू - शहादा तालुक्यातील निखिल वाडीले नावाचा युवक येथील उंच शिखरावर दर्शनासाठी आला असता त्याचा पाय घसरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तरुणाला अचानक भोवळ आल्यानं उंच शिखरावरून खोल दरीत पडल्यानं तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शींकडून सांगण्यात आली आहे. याबाबत धडगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.