सोलापूर Asim Sarode News : अॅड. असीम सरोदे आणि डॉ विश्वंभर चौधरी यांनी सभेत भारतीय जनता पक्षावर सडकून टीका केली. भाषणानंतर माध्यमांशी संवाद साधत असताना अॅड असीम सरोदे आणि डॉ विश्वंभर चौधरी यांनी पुणे पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त केला. आमच्या वाहनावर हल्ला झाला त्यावेळी पोलीस त्याठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हल्ला झाल्यानंतर आमची तक्रारदेखील योग्यप्रकारे लिहून घेतली नाही, असं ते म्हणाले.
उदय सामंत यांच्यावर दगडफेक करणाऱ्यावर गुन्हा दाखल : मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर दगडफेक करणाऱ्या व्यक्तीवर भा.द.वि. 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आमच्या वाहनाची काचं फोडून आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तरी देखील आमची म्हणावी तशी तक्रार घेतली नाही. पुणे भाजपामधील नेता धीरज घाटे आणि देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी अॅड असीम सरोदे यांनी यावेळी केली.
राज्य पोलीस दलातील अधिकारी भाजपाचे पाळीव : पुढं ते म्हणाले की, "आम्ही ज्यावेळी निर्भय सभेला निघालो त्यावेळी आमच्या वाहनाचा नंबर हल्लेखोरांना कोणी सांगितला? महाराष्ट्र आणि पुणे पोलीस दलातील काही अधिकारी आणि कर्मचारी हे भाजपाचे पाळीव झाले आहेत." तसंच चतुशृंगी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि डेक्कन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची चौकशी झाली पाहिजे. पुणे पोलीस दलातील काही अधिकारी आणि कर्मचारी असं सांगतात की, आम्ही भाजपाचे पोलीस अधिकारी आहोत. हल्ला झाला त्यादिवशी पोलीस दलातील डीसीपी सयाजी कदम कुठे होते? त्याबाबत आम्हाला माहिती हवीय, अशी मागणीही यावेळी अॅड असीम सरोदे यांनी केली.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार फडणवीसांचे लाडके : पुणे पोलीस आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील गुंडाची परेड घेतली. यावर बोलताना अॅड असीम सरोदे यांनी अमितेशकुमार यांना उपहासात्मक सल्ला दिला. ते म्हणाले की, "पुण्यात एकूण 28 टोळ्या आहेत. या अशा छोट्या गुंडांना बोलावून परेड का घेता? राजकारणातील गुंडाची परेड घ्या. तसंच पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार हे देवेंद्र फडणवीसांचे लाडके आहेत. त्यामुळे त्यांची बदली नागपुरहून पुणे येथे करण्यात आली", असंही सरोदे म्हणाले.
हेही वाचा -