मुंबई Maratha Kranti Morcha : राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी अद्याप सगे-सोयरे हा शब्द लागू करण्यात आलेला नाही. राज्य सरकारने मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण द्यावे. सगे-सोयरे या शब्दावर जोर देत आता राज्य आणि केंद्र सरकारला धडा शिकवला पाहिजे, असा पवित्रा मराठा आंदोलनाचे नेते म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी घेतला होता.
लोकसभा उमेदवारीसाठी अर्ज दाखल करा : सुमारे 15 दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर सभेत आवाहन केलं होतं की, केंद्र आणि राज्य सरकारला आता मराठा समाजाची ताकद दाखवण्याची गरज आहे. त्यासाठी मराठा समाजातील तरुणांनी आता लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करावेत. प्रत्येक गावातून दोन तरुणांनी अर्ज दाखल करावेत. एका मतदारसंघात शेकडो तरुणांनी उभे राहावे. म्हणजे मराठा समाजातील ताकद दिसेल, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं होतं. या आवाहनानुसार मराठा समाजातील तरुणांनी लोकसभा निवडणुकीची तयारीसुद्धा अनेक गावांमध्ये सुरू केली होती.
मनोज जरांगे यांच्या भूमिकेशी सहमत : या संदर्भात मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक चंद्रकांत भारड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अगदी योग्य आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण आणि सगेसोयरे या शब्दाची अंमलबजावणी होण्यासाठी आता सरकारला आपली ताकद दाखवणे आवश्यक आहे. त्यामुळेच आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही जास्तीत जास्त संख्येनं आमचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. अन्य कोणत्या पक्षाला यातून त्रास देण्याचा आमचा हेतू नाही. केवळ आम्हाला आमच्या आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षाचा भाग म्हणून ही लढाई लढायची आहे. काही संघटना ज्यांचा राजकीय हेतू आहे त्या आता आमच्या या निर्णयापासून दूर होत आहेत; परंतु आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत, असे चंद्रकांत भारड यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी नाही : मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी सांगितले की, आमचा संघर्ष हा आरक्षणासाठी आहे. मराठा समाजाला जास्तीत जास्त नोकरी आणि शिक्षणात सवलती मिळाव्यात यासाठी आहे. या संदर्भात राज्य सरकार बरोबर आमचा संघर्ष होता; मात्र आता सरकारने मराठा आरक्षण दिलेच आहे. शिवाय नोकरी आणि शिक्षणातही मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या आहेत. मराठा समाजाला यापूर्वीच राजकीय प्रतिनिधित्व लाभले आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधात लोकसभा निवडणुकांमध्ये अशा पद्धतीनं उमेदवारी देणं योग्य नाही. मराठा समाजातील तरुणांनी निवडणुकांमध्ये उमेदवारी करण्यासाठी भरावी लागणारी डिपॉझिट रक्कम आणि करावा लागणारा खर्च याबाबतचा विचार करायला हवा. अशा पद्धतीनं अव्यवहार्य निर्णय घेणं अयोग्य असल्याचं आबासाहेब पाटील यांनी सांगितलं.
केवळ आरक्षणासाठी संघर्ष : या संदर्भात बोलताना मराठा महासंघाचे नेते संभाजी दहातोंडे पाटील यांनी सांगितलं की, मराठा महासंघाची भूमिका या संदर्भात वेगळी आहे. मराठा महासंघ हा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कायम आग्रही असलेली संघटना आहे. तसंच राज्य सरकारने दरम्यानच्या काळात काही महत्त्वाचे निर्णय मराठा समाजासाठी घेतले आहेत. सारथीच्या माध्यमातून काही सवलती दिल्या जात आहेत. आरक्षणाचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं राजकीय स्टंट करणं मराठा महासंघाला पटत नसल्याचं दहातोंडे यांनी सांगितलं.
जरांगे पाटील यांची ही भूमिका नाही : या संदर्भात बोलताना मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा या संदर्भात निवडणुका धोक्यात आणा अशी भूमिका घेतलेली नाही. लोकशाहीला घातक असा कोणताही निर्णय त्यांनी घेतलेला नाही अथवा तसं आवाहन केलेलं नाही. त्यामुळे मराठा समाजातील उमेदवारांनी अर्ज भरावेत आणि हजारोंच्या संख्येनं उमेदवारी दाखल करावी, असा जो प्रचार केला जात आहे तो खरा नाही. या संदर्भात मनोज जरांगे पाटील अथवा मराठा समाजाने आपली अंतिम भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे मराठा समाजातील हजारो उमेदवार लोकसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी शक्यता सध्या तरी नाही.
हेही वाचा :