मुंबई : मिठी नदीचं रुंदीकरण, खोलीकरणाचं आतापर्यंत 95 टक्के काम पूर्ण झालं असून संरक्षक भिंतीचं काम 90 टक्क्यांपर्यंत पूर्ण झालं आहे. आता मिठी नदीच्या तिसऱ्या टप्प्याचं काम पालिकेनं सुरू केलं असून, यंदाच्या अर्थसंकल्पात पुढील 10 वर्षांसाठी 3 हजार 67 कोटी रुपये खर्च करण्याचं प्रस्तावित आहे. मिठी नदी विकास, प्रदूषण नियंत्रण योजनेची अंमलबजावणी 4 टप्प्यांत प्रस्तावित आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या टप्प्यासाठी पालिकेकडून 451. 75 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हे काम तीन टप्प्यात केलं जात आहे. त्यापैकी 'ब्रेक थ्रू' कनाकिया झिलिऑन, लाल बहादूर शास्त्री मार्ग येथील दुसऱ्या टप्प्यातील सांडपाणी बोगद्याचं काम पूर्ण झाल्याची माहिती पालिकेनं दिली.
मिठी नदीचं पाणी स्वच्छ राहण्यास मदत : बापट नाला तसंच सफेद पूल नाल्यातून मिठी नदीत वाहून जाणारे अंदाजे 168 दशलक्ष लिटर पाणी या भूमिगत गटार बोगद्याद्वारे धारावीतील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात नेण्यात येणार असल्याचं पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. त्यानंतर सांडपाण्यावर प्रक्रिया करून माहीम निसर्ग उद्यानातील खाडीत सोडण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळं मिठी नदीचे पाणी स्वच्छ राहण्यास मदत होईल, पर्यायानं पर्यावरणाचा समतोलही राखला जाईल, अशी माहिती पालिकेनं दिली आहे.
पाण्याचा फायदा होणार : सांडपाणी मिठी नदीत न जाता या पाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार असल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे. सांडपाणी मिठी नदीत मिसळण्यापूर्वी या पाण्यावर प्रक्रिया केल्यामुळं पर्यवरणाचं रक्षण होणार आहे. त्यामुळं किनारपट्टीचा परिसर स्वच्छ ठेवत, पाण्याचा फायदा पर्यावरणालाही होणार आहे. तसंच किनारी भागात राहणाऱ्या नागरिकांना या पाण्याचा फायदा होणार असल्याचं प्रकल्प विभागाचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितलं.
भूमिगत गटार बोगदा बांधणार : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत हा भूमिगत गटार बोगदा बांधण्यात येत आहे. बोगद्याची एकूण लांबी 6.70 किलोमीटर आहे. तसंच सरासरी खोली सुमारे 15 मीटर आहे. हा भारतातील सर्वात लहान व्यासाचा सांडपाणी बोगदा आहे. त्याचा अंतर्गत व्यास 2.60 मीटर आहे. तर बाह्य व्यास 3.20 मीटरचा आहे. बोगद्याच्या संरेखनात एकूण 5 शाफ्ट प्रस्तावित आहेत. सेगमेंटल लाइनिंग पद्धत तसंच अर्थ प्रेशर बॅलन्स टनल बोरिंग मशीन वापरून हा सांडपाणी बोगदा बांधण्यात येत असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे.
हे वाचलंत का :