अमरावती : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होईल. निवडणुकीच्या प्रचारात पक्षांकडून विविध फंडे वापरले जात आहेत. अमरावती विधानसभा मतदारसंघात एका उमेदवारानं चक्क प्रचारासाठी नवा कोरा रोड रोलर खरेदी केला. इंडियन युनियन मुस्लिम लीगचे इरफान खान असं या उमेदवाराचं नाव आहे. त्यांना रोड रोलर हे निवडणूक चिन्ह मिळताच चक्क नवाकोरा रोड रोलर खरेदी करून आपल्या प्रचार कार्यालयासमोर उभा केला. रोषणाईनं सजलेला हा रोड रोलर चर्चेचा विषय ठरलाय.
रोड रोलरवर झगमगाट : जमील कॉलनी परिसरात इरफान खान यांचं प्रचार कार्यालय आहे. या प्रचार कार्यालयात दिवसा आणि रात्री हजारोच्या संख्येनं गर्दी उसळत असतानाच प्रचार कार्यालयाच्या अगदी समोर इरफान खान यांनी उभा केलेला रोड रोलर सगळ्यांचं लक्ष वेधतोय. विशेष म्हणजे, या रोड रोलरवर विविधरंगी रोषणाई करण्यात आली असून रोड रोलरवरील झगमगाट या भागातून जाणाऱ्या प्रत्येकाला आकर्षित करत आहे.
परिसरात रोड रोलरची चर्चा : "निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर निवडणूक चिन्हासाठी शिडी, ऑटो रिक्षा, आणि रोड रोलर अशी पसंती दर्शविली. मात्र, मला रोड रोलर हे चिन्ह मिळालं. माझ्याकडे आधीच एक मोठा रोड रोलर होता. निवडणूक चिन्ह मिळाल्यामुळं मी आणखी एक रोड रोलर नव्यानं खरेदी करून प्रचार कार्यालयासमोर उभा केला. रोषणाईनं सजवलेल्या हा रोड रोलर पाहून लहान मुलांना देखील आनंद वाटतो आणि परिसरात हा रोड रोलर चर्चेचा विषय ठरलाय," असं इरफान खान 'ईटीव्ही भारत ' शी बोलताना म्हणाले. "निवडणुकीत आमचा रोड रोलर वेग धरेल आणि आमचा विजय होईल," असा विश्वास देखील इरफान खान यांनी व्यक्त केला.
तीन एकर जमिनीवर हॉकीचं ग्राउंड : "अमरावती शहरात स्वतःच्या तीन एकर जमिनीवर मी हॉकीचं अत्याधुनिक मैदान तयार केलं. संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर अमरावती सारखं हॉकीचं मिनी स्टेडियम कुठंही नाही. 'अखिल भारतीय स्पर्धा' देखील आम्ही या मैदानावर घेतली. रोड रोलरच्या साह्यानंच हे मैदान तयार झालं," अशी माहिती देखील इरफान खान यांनी दिली.
हेही वाचा