पुणे Bike Rally For Purush Aayog : भारतात अनेक आयोग स्थापन होऊन त्या त्या आयोगाच्या माध्यमातून त्या त्या आयोगाचं काम हे चालत असतं. अश्यातच गेल्या काही वर्षापासून भारतात पुरुषांच्या प्रमुख प्रश्नाच्या संदर्भात पुरुष आयोगाची (Purush Aayog) मागणी जोर धरू लागली आहे. याच पुरुष आयोगासाठी दिल्लीतील डॉ. अमजदखान नदीम शेख आणि संदीप पावरिया या दोघांनी भारतभर बाईक रॅली सुरू केली असून आज त्यांनी पुण्यात प्रवेश केला होता. (National Commission for Men)
भारतात पुरुष आयोग स्थापन करा : मूळचे कोल्हापूरचे पण सध्यस्थितीत दिल्लीत राहणारे प्रख्यात बाईकर्स डॉ. अमजदखान नदीम शेख आणि संदीप पावरिया यांनी 26 मे रोजी भारतात पुरुष आयोग स्थापन व्हावं यासाठी दिल्ली येथील गुरुग्राम येथून या प्रवासाला सुरुवात केलीय. संपूर्ण भारतात जवळपास 15,000 किमी प्रवास करून पुरुषांच्या समस्यांबद्दल जागरुकता निर्माण करणं आणि भारतात पुरुष कल्याण आयोग स्थापन करण्यासाठी पाठिंबा गोळा करणं हे त्यांचं ध्येय आहे.
पुण्यात रॅलीचं आगमन : मेन वेल्फेअर ट्रस्ट आणि सेव्ह इंडियन फॅमिली यांनी जागरूकता वाढवण्यासाठी आणि वाढत्या पुरुषांच्या आत्महत्या आणि लिंग-आधारित कायद्यांचा गैरवापर यासारख्या गंभीर समस्यांना तोंड देण्यासाठी या अभूतपूर्व कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. ही राइड दिल्ली, लखनौ, गोरखपूर, सिलीगुडी, कोलकाता, भुवनेश्वर, गुंटूर, चेन्नई, रामेश्वरम, कन्याकुमारी, त्रिशूर, गोवा, कोल्हापूर, पुणे, मुंबई, अहमदाबाद, जैसलमेर, बिकानेर, चंदीगड, जम्मू, कारगिल, लेह या प्रमुख शहरांमधून गेली आहे.आज या रॅलीचं पुण्यात आगमन झालं होतं.
भारतात पुरुषांच्या बाजूने एकही कायदा नाही : याबाबत डॉ. अमजदखान शेख म्हणाले की, आम्ही भारतात पुरुष आयोग स्थापन व्हावं या मागणीसाठी भारतभर या रॅलीचं आयोजन केलं आहे. आज भारतात अनेक आयोग आपल्याला पाहायला मिळतात पण पुरुषांच्या प्रश्नांच्या संदर्भात कोणतेही आयोग नाही. आज आम्ही ज्या ज्या ठिकाणी जात आहोत तिथं लोक आम्हाला पुरुष आयोगाच्या मागणीसाठी पाठिंबा देत आहेत. आज भारतात पुरुषांच्या बाजूने एकही कायदा नाही. महिलांच्या बाजूने अनेक कायदे पाहायला मिळतात पण पुरुषांच्या बाबतीत कोणताही कायदा दिसत नाही. पुरुषांवर कुठेही अत्याचार झाला तर ते आपला हक्क कोणाकडे मागतील? यासाठी आज आम्ही पुरुष आयोगाच्या मागणीसाठी भारतभर या रॅलीचं आयोजन केलंय. आत्तापर्यंत आर्ध भारत बाईकवर झालं आहे. आत्ता यापुढे जाऊन संपूर्ण भारतभर फिरून पुरुषांना एकत्र करून दिल्लीत या रॅलीचा समारोप करणार आहोत.
हेही वाचा -