पुणे Ajit Pawar On Rohit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुत्र पार्थ पवारांनी पुण्यातील मारणे टोळीचा प्रमुख गजानन मारणेची भेट घेतली होती. त्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. "जे झालं ते चुकीचं झालं, माझी पार्थ पवारांची भेट झाली नाही. भेट झाल्यानंतर मी समजावून सांगेन, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी रोहित पवार, शरद पवार यांच्यावर ईडी चौकशीवरुन निशाना साधला. पालकमंत्री अजित पवार यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यातील पोलीस ग्राउंडवर ध्वजवंदन केलं आणि मानवंदना स्वीकारली. त्यानंतर ते माध्यमाशी बोलत होते. यावेळी सर्वांना त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे : मनोज जरंगे यांच्या मोर्चावर बोलताना अजित पवार म्हणाले, "मराठा आरक्षण संदर्भात काल मी बोललो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सचिवांना पाठवलं आहे, ते चर्चा करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून चर्चा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. विधी आणि न्याय खात्याचे काही लोकं आहेत, सचिव भांगे हे चर्चेला गेले आहेत. चर्चेतून तोडगा निघत असतो."
आम्ही ईडी चौकशीचा इव्हेंट केला नाही : रोहीत पवार यांना ईडी चौकशीला बोलवण्यात आलं आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले "माझी पण एसीबीनं चौकशी केली होती, पण आम्ही कधी इव्हेंट केला नाही. कोणी काय करायचं हा त्याचा अधिकार आहे. कोणी काय आरोप करायचे, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. चौकशीचे आदेश ज्याला आहेत, ते चौकशीला बोलावतात. आपण उत्तरं द्यायची असतात. माझी पण ACB ने 5 तास चौकशी केली होती. आयकर विभागाचे लोकं पण आले होते."
माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत : "माझ्या एसीबी चौकशीचा आम्ही एव्हढा प्रपोगंडा केला नाही, लोकं गोळा करत नाहीत. त्याचा इव्हेंट करत नाहीत. कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. कोणा कोणाच्या चौकशीला बोलवल्यानंतर कोणी कोणी कुठं हजर राहावं, त्याचा अधिकार आहे," असं म्हणत अजित पवार यांनी आमदार रोहित पवार तसेच शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. रोहित पवारांच्या चौकशी वेळी शरद पवार सुद्धा कार्यालयात गेले होते. आमचा दादा पळणारा नाही तर लढणारा आहे, असं अजित पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बॅनर लावत आहे. त्यावर अजित पवार म्हणाले, "करू देत, माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत."
हेही वाचा :