मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. नार्वेकर यांनी दोन्ही गटांनी सादर केलेले पुरावे, कागदपत्रे तपासली, असून दोन्ही गटातील आमदार पात्र असल्याचं म्हटलं आहे. तसंच दोन्ही गटांच्या नेत्यांची उलटतपासणी केल्यानंतर या प्रकरणाचा निकाल जाहीर झाला आहे. अजित पवार गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी शरद पवार गटानं केलेल्या सर्व याचिका नार्वेकर यांनी फेटाळून लावल्या आहेत. त्यावर राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत.
शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता निकालावर विरोधांनी टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल पक्षपाती असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी " ‘राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवार आणि शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, आज नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयामुळं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची झाली आहे. अजित पवार भाजपाचे असल्याचं आता उघड झालं आहे", अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. पदासाठी, सत्तेसाठी या लोकांनी आपली विचारधारा गहाण ठेवल्याचा त्यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे.
संविधानिक व्यवस्था वेठीस : या संदर्भात बोलताना काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, "विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अनपेक्षित निकाल वाचून दाखवला. भाजपानं या देशाच्या संविधानिक व्यवस्था वेठीस धरण्याचं काम सुरू केलं आहे. त्याचं उत्कृष्ट उदाहरण शिवसेनेच्या फुटी संदर्भात तसंच राष्ट्रवादीच्या फुटी संदर्भातील निकाल आहेत. मात्र, आम्हाला आत्मविश्वास आहे. सर्वोच्च न्यायालय, या देशाची घटना, देशाची राजकीय संस्कृती या दोन्ही बाबींचा विचार करेल. त्यामुळं लोकांनी निवडून दिलेलं सरकार जनतेच्या इच्छेचं सरकार असलं पाहिजे. या निकालांमुळं राज्यघटनेच्या दहावी अनुसूचीचं 10 शेड्युल नक्कीच न्याय देईल, अशी अपेक्षा लोंढे यांनी व्यक्त केलीय.
निकालामुळं कायद्याचा अवमान : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राष्ट्रवादीच्या कोणत्याही आमदाराला अपात्र न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर या निकालावर शरद पवार गटाकडून जोरदार टीका होत आहे. "आम्ही आज अपात्र झालो नसलो, तरी एकूणच निकालामुळं कायद्याचा अवमान नक्कीच झाला आहे", अशी टीका शरद पवार गटनेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
हे वाचलंत :