अहमदनगर Ahmednagar Lok Sabha Election 2024 : मंगळवारी देशात तिसऱ्या टप्प्याचं मतदान झालं. यात भाजपाला सर्वत्र पाठिंबा मिळाल्याचा दावा मोदींनी केलाय. ते मंगळवारी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते. यावेळी पंतप्रधान म्हणाले, "तिसऱ्या टप्प्यातील मतदानानं एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. इंडिया आघाडीची 'एक्सपायरी डेट' 4 जून निश्चित करण्यात आली. त्यानंतर इंडिया आघाडीचे झेंडे उचलायला कोणीही दिसणार नाही. निवडणुकीपूर्वी जोडलेलं भानुमतीचं कुटुंब ४ जूननंतर दिसणार नाही." "यंदाची निवडणूक संतुष्टीकरण विरुद्ध तुष्टीकरण अशी आहे. भाजपाकडून देशवासियांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तर इंडिया आघाडीचे नेते त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसनं 50 वर्षे गरिबी हटवण्याचं खोटं आश्वासन दिलं," असंही मोदी म्हणाले.
कसाबची बाजू घेत काँग्रेस पाकिस्तानला क्लीन चिट देतंय : "काँग्रेसनं 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारासाठी पाकिस्तानला क्लीन चिट दिली. तसंच दोषी ठरलेल्या आणि नंतर फाशीची शिक्षा झालेल्या दहशतवादी अजमल कसाबचं काँग्रेसनं समर्थन केलं आहे. मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेसच्या एका नेत्याचं विधान अत्यंत धोकादायक आहे. हे काँग्रेस नेते आता दहशतवादी कसाबची बाजू घेत आहेत," अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली.
काँग्रेसवर गंभीर आरोप : "अहमदनगर जिल्हा महाराष्ट्राच्या विकासात अग्रेसर आहे. विखे पाटील यांचं या जिल्ह्यात मोठं योगदान आहे, याची आज आठवण येते. तिसऱ्या टप्प्यातील मतदान झालं. भाजपा आणि 'एनडीए'ला जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. काँग्रेसची जागा मुस्लिम लीगनं घेतली आहे. विकास, सुरक्षा, प्रतिष्ठा आणि स्वाभिमान हा एनडीएचा मुद्दा आहे. मात्र, यापैकी एकाही मुद्द्यावर काँग्रेस बोलत नाही. 50 वर्षांपासून काँग्रेसनं गरिबी हटावचा नारा दिला होता. इंडिया आघाडीचं सरकार आलं, तर ते गोरगरिबांचं आरक्षण काढून मुस्लिमांना देतील. ते आपली व्होट बँक खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत," असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला.
मोदी सरकारची विकासाची हमी : "मोदी सरकारनं विकासाची हमी दिली आहे. काँग्रेसनं शेतकऱ्यांना संकटात ढकललं आहे. नगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाचं 1970 पासून काम सुरू झालं. त्यावेळी धरण बांधण्यासाठी 8 कोटी रुपये खर्च येणार होता, तो आता 5000 कोटी झाला आहे. काँग्रेसनं हे पाप केलं आहे. निळवंडे धरणातून हजारो एकर शेती ओलिताखाली येणार आहे. मोदी सरकारचं प्राधान्य शेतकरी आहे. मोदी सरकारच्या काळात ऊस उत्पादकांना जास्त पैसे मिळाले आहेत," असंही मोदी म्हणाले.
वारकरी पगडी देऊन मोदींचा सत्कार : अहमदनगरमधील महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला. उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील, सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अहमदनगरमध्ये सभा पार पडली. यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वारकरी पगडी, वीणा, ज्ञानेश्वरी देऊन मोदींचा सन्मान केला. तसंच सुजय विखे यांनी मोदींना घोंगडी, काठी तसंच अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा दिली.
हे वाचलंत का :
- विजय वडेट्टीवार पाकिस्तानात...?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल, ठाकरेंवरही हल्लाबोल - Devendra Fadnavis
- शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दत्तात्रय भरणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Dattatray Bharane Viral Video
- शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांचा भाजपामध्ये प्रवेश; देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मुख्यमंत्र्यांना सांगून त्यांना..." - Rajendra Gawit Join BJP