मुंबई Solar Energy Sets : राज्यातील पायाभूत सुविधांवर अधिकाधिक भर देण्याचा शासनाचा प्रयत्न असताना अद्यापही राज्यातील सुमारे 36 हजार 978 अंगणवाड्या विजेपासून वंचित आहेत. यासंदर्भात राज्याच्या महिला आणि बालविकास विभागानं सातत्यानं पाठपुरावा करून या अंगणवाड्यांवर आता सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज पोहोचवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. एका संचासाठी वाहतूक खर्च वगळता सुमारे एक लाख 24 हजार 608 रुपये खर्च होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
काय आहे अंगणवाड्यांची स्थिती : राज्यात महिला आणि बालविकास विभागामार्फत एकूण 553 बालविकास प्रकल्प कार्यरत आहेत. या बालविकास प्रकल्पांपैकी 449 प्रकल्प ग्रामीण आदिवासी क्षेत्रात आहेत, तर उरलेले 104 प्रकल्प हे नागरी क्षेत्रात कार्यरत आहेत. नागरी प्रकल्प क्षेत्रातील सर्वच अंगणवाड्यांमध्ये विद्युत व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली असून राज्यात ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रात एकूण 94846 अंगणवाडी केंद्र आहेत. यापैकी 70 हजार 879 अंगणवाड्या या शासनाच्या मालकीच्या इमारतींमध्ये आहेत. या इमारतीपैकी सुमारे 36 हजार 978 अंगणवाडी केंद्रांमध्ये अद्यापही वीज उपलब्ध नाही. त्यामुळं या अंगणवाडी केंद्रांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे वीज पुरवठा करण्यात यावा असा प्रस्ताव महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी शासनाला सादर केला होता.
सौर ऊर्जेसाठी शासनाची सकारात्मक भूमिका : राज्य शासनानं महिला आणि बालविकास विभागामार्फत पाठवण्यात आलेल्या या प्रस्तावावर सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यानुसार आता राज्यातील अंगणवाडी केंद्रावर कोणते सौर ऊर्जा संच उपयुक्त ठरतील याबाबत महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्था अर्थात मेडा कडून माहिती घेतली आहे. पारेषण विरहित सौर संयंत्र बसविल्यास उपयुक्त ठरेल ,अशी शिफारस मेडा कडून करण्यात आली आहे. त्यानुसार प्रति सौर विद्युत एक किलोवॅट संच क्षमता असलेल्या सौर संयंत्रांची उभारणी अंगणवाड्यांमध्ये करण्यात येणार आहे. प्रति सौर ऊर्जा संचाची किंमत ही एक लाख 34 हजार 608 रुपये इतकी आहे. त्यामुळं राज्यातील 36 हजार 778 अंगणवाड्यांवरती सौर ऊर्जा संच बसवण्यासाठी सुमारे 460 कोटी 77 लाख रुपये खर्च येणार आहे. या खर्चालाही लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता असून राज्यातील अंधारात असलेल्या अंगणवाड्या सौर ऊर्जेच्या माध्यमातून उजळल्या जातील, असा विश्वास मंत्री तटकरे यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा -