अमरावती : चिखलदरा येथे शुक्रवारी रात्री साहित्यिक प्रा. अशोक थोरात यांच्या अध्यक्षतेत आयोजित सोहळ्यात 'अक्षर मानव साहित्य संमेलनाचं' उद्घाटन सिनेअभिनेता भारत गणेशपुरे यांच्या हस्ते झालं. यावेळी 'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले विनोदी अभिनेता अंकुर वाढवे यांनी त्याच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडलेला अफलातून किस्सा सांगितला.
संमेलनात सांगितला अफलातून किस्सा : अभिनेता अंकुर वाढवे यांनी चिखलदऱ्याच्या गार वातावरणात ऑटोरिक्षात मी, चार तरुणी आणि भन्नाट शांतता हा त्याच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडलेला अफलातून किस्सा आठव्या 'अक्षर मानव साहित्य संमेलना'च्या उद्घाटन सोहळ्यात सांगितला. अन तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाला पहिल्याच दिवशी हास्यविनोदाची खास मेजवानी मिळाली.
असा आहे भन्नाट किस्सा : यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यावर अमरावतीच्या विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत मराठी भाषेत पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणासाठी अंकुर वाढवे आले होते. शिक्षण घेत असतानाच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात युवा महोत्सवाच्या रंगीत-तालीमेसाठी सतत विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था येथून विद्यापीठात ऑटो रिक्षानं ते जायचे. अमरावतीतला ऑटोरिक्षा मागे सहा प्रवासी आणि चालकाजवळ दोन ते तीन प्रवासी घेऊन धावतात. अशाच गर्दी असणाऱ्या एका ऑटोरिक्षात अंकुर चढले असता, त्यांना अगदी लहान मुलगा समजून महाविद्यालयीन युवतीनं मांडीवर बसवलं होतं.
किश्श्यानं रंगलं अक्षर मानव साहित्य संमेलन : महाविद्यालयाच्या परिसरापासून गाडगे नगर, पंचवटी चौक, बियाणी चौक असे महत्त्वाचे चौक पार करत ऑटो रिक्षा विद्यापीठाच्या दिशेने धावत असताना मधात ऑटो रिक्षातील प्रवासी उतरले. एका स्टॉपवर तर ऑटो रिक्षा चालकाजवळ बसलेले दोन प्रवासी देखील उतरून गेले. असं असताना अंकुर यांनी मात्र महाविद्यालयीन युवतीच्या मांडीवरून उठले नाहीत. त्या युवतीच्या मैत्रिणींनी सहज म्हणून बाळा, तू कुठे चाललास असं विचारलं असता, अंकुर यांनी मी विद्यापीठात चाललो असं उत्तर दिलं होतं. तुझा विद्यापीठाशी काय संबंध असं आणखी एका युवतीनं विचारताच मी एम. ए भाग दोनचा विद्यार्थी आहे असं अंकुर यांनी सांगितलं होतं. त्यावेळी ऑटोरिक्षातील चारही युवतींना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर 'जागा झाली बस' इतकंच ती युवती म्हणाली. अंकुर हे युवतीच्या मांडीवरून उठून समोर ऑटो चालकाजवळ जाऊन बसले. त्यानंतर मात्र विद्यापीठ येईपर्यंत ऑटोरिक्षात भन्नाट शांतता पसरली होती. कोणीही कोणाशी काहीही बोललं नाही. हा सारा किस्सा अंकुर वाढवे यांनी सांगताच संमेलनाला उपस्थितांची हसता हसता पुरेवाट झाली.
संमेलनाचं 'असं' आहे वैशिष्ट्य : ईश्वर, जात, धर्म, भाषा असे सारे भेद दूर करणे आणि विचारांनी माणूस सजग व्हावा, या उद्देशानं राजन खान यांनी 'अक्षर मानव' ही संघटना स्थापन केली. या संघटनेच्या माध्यमातून 'अक्षर मानव साहित्य संमेलन' गत आठ वर्षांपासून आयोजित केलं जात आहे. यावर्षी विदर्भातील थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या चिखलदरा येथे 8, 9 आणि 10 नोव्हेंबर असे तीन दिवस हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. या संमेलनात 'विदर्भातील जंगलं आणि वन्यजीव', 'गेल्या तीन दशकातील कवितेचे बदललेले स्वरूप', 'मराठी पुस्तकांचा खप आणि वाचन', 'बाल साहित्याची दशा', 'मराठी साहित्य आणि चित्रपट 'या विषयांवर विचार मंथन केलं जाणार आहे.
या मान्यवरांची उपस्थिती : या संमेलन सोहळ्यात स्वागताध्यक्ष म्हणून माजी शिक्षण संचालक तथा स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडचे माजी कुलगुरू डॉ. के. एम. कुलकर्णी प्रामुख्यानं उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ साहित्यिक अशोक मानकर, हिंदी उर्दू शायर किरण काशिनाथ, संजीवनी राजगुरू, अश्विनी चितोडे, प्राचार्य डॉ. पृथ्वीराजसिंह राजपूत, प्राचार्य डॉ. एकनाथ तट्टे, प्राध्यापक डॉ. संजय खडसे, प्रा. विलास भवरे यांच्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील साहित्यिक प्रामुख्यानं सहभागी झाले होते.
हेही वाचा -