पुणे Chandrashekhar Bawankule : 'नागपूर ऑडी हिट अँड रन' प्रकरणात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाचं नाव समोर आलं. त्यानंतर अनेक प्रश्न या अपघाताबाबत उपस्थित केले जात आहेत. यावर खुद्द चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. "हा पूर्ण चौकशीचा भाग आहे. माझा मुलगा असो की सर्वसाधारण कुटुंबातील मुलगा असो, जी कारवाई सर्वसाधारण कुटुंबाच्या मुलावर होईल तीच कारवाई माझ्या मुलावर देखील व्हायला पाहिजे. नियमात असेल ती कारवाई व्हायला पाहिजे," असं स्पष्टीकरण देत चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. बावनकुळे यांचा मुलगा असल्यानं कारवाई होत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.
गाडीत बसणारा देखील दोषी : "सोमवारी माझ्यासोबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मात्र, तरीही या विषयावर मी त्यांच्यासोबत काहीही बोललो नाही. तसंच मी पोलीस आयुक्तांना देखील एकही शब्द बोललो नाही. या प्रकरणात जे नियम सर्वांसाठी आहेत, तेच नियम लागले पाहिजे. गाडीत बसणारा देखील दोषी आहे आणि गाडी चालवणारा देखील दोषी आहे," असं बावनकुळे म्हणाले.
कारवाई व्हायला पाहिजे : "अपघात झाल्यावर गाडी चालक का पळाला? तिथं नेमकं काय झालं? हा पोलीस चौकशीचा भाग आहे. त्यामुळं मी जर चौकशीवर अधिक काही बोललो तर ते पोलिसांवर दडपण आणल्यासारखं होईल. पोलिसांना त्यांचं काम करू द्या, मी कधीही असं म्हणणार नाही की माझा मुलगा आहे तर कारवाई करू नका. जे नियमात आहे त्यानुसार कारवाई व्हायला पाहिजे. परमेश्वराच्या कृपेनं तिथं कोणतीही जीवितहानी झाली नाही हे महत्त्वाचं आहे, " असं म्हणत बावनकुळे यांनी कठोर कारवाईची मागणी केली.
संकेत बावनकुळे कारमध्ये होता : रविवारी मध्यरात्री नागपुरात एका ऑडी कारनं काही वाहनांना जोरदार धडक दिली. अपघात झाला त्यावेळी 'ऑडी'मध्ये तीन लोकं होते. अर्जुन हावरे, रोनित चिंतनवार व संकेत बावनकुळे हे तिघे या 'ऑडी'मध्ये बसले होते. अपघातावेळी संकेत बावनकुळे कारमध्ये होता, हे अखेर नागपूर पोलिसांनी मान्य केलंय. संकेत हा 'ऑडी' कार चालवणाऱ्या अर्जुनच्या बाजूला बसला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. संकेत हा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा आहे.
हेही वाचा -