चंद्रपूर Chandrapur News : लाच ही फक्त पैशाच्या स्वरूपात असते असं नाही. भ्रष्ट व्यक्ति असला की, तो कशाच्याही स्वरूपाची लाच मागू शकतो. असाच एक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर स्टेशन येथून समोर उघडकीस आला. शेतातील विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विद्युत कर्मचारी लाच म्हणून शेतकऱ्यांकडून तांदूळ वसूल करायचा. ते न दिल्यास थेट वीज पुरवठा खंडित करायचा. शालेंद्र चांदेकर असं या लाचखोर कर्मचाऱ्याचं नाव आहे. या कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडत अटक केली आहे.
काय आहे प्रकरण? : चंद्रपूर जिल्ह्याच्या टोकावर विरुर स्टेशन हे गाव आहे. येथे उत्तम दर्जाच्या धानाची शेती (भात शेती) होते. या पट्ट्यात धानाचे दोनदा पीक घेतलं जातं. मात्र, धान पिकविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. प्रत्येक शेतकऱ्याच्या पंपाला वीज देण्याचं शासनाचं धोरण आहे. मात्र यासाठीदेखील शेतकऱ्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. विरुर स्टेशन येथील परिसरात शालेंद्र देवेंद्र चांदेकर या वीज नियंत्रण मंडळाच्या कर्मचाऱ्यानं शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्यासाठी वेठीस धरणं सुरू केलं होतं. तो विरुर स्टेशन उपविभागात तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होता. वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तो लाच मागायचा. जो पैसे देऊ शकत नाही, अशा शेतकऱ्यांकडून तो 20 किलो तांदूळ वसूल करायचा, अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्याची धमकी तो द्यायचा.
तब्बल तीन दिवस विद्यूत पुरवठा ठेवला बंद : तक्रारदाराला विद्युत पंपासाठी थ्री फेज पुरवठा आवश्यक आहे. हा विद्यूत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी चहांदे हा शेतकऱ्यांना पैशाची मागणी करत होता. याचप्रमाणं त्यानं तक्रारदाराला देखील मागणी केली. ती पूर्ण न झाल्यानं त्यानं थेट वीज कापणी केली. तब्बल तीन दिवस त्यानं हा पुरवठा खंडित करून ठेवला. विचारणा केली असता प्रत्येकी दीड हजार रुपये किंवा प्रत्येकी 20 किलो तांदूळ अशी लाच मागितली. अन्यथा वीज पुरवठा सुरू करणार नसल्याचं त्यानं स्पष्ट केलं. अखेर याला त्रासून शेतकऱ्यानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार केली. तडजोडीअंती पाच हजार लाच देण्याचे ठरले. 16 फेब्रुवारीला सापळा रचण्यात आला. तसंच ही लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं या विद्युत कर्मचाऱ्याला रंगेहात अटक केली आहे.
हेही वाचा -