मुंबई Somalian Pirates : भारतीय नौदलानं नुकतंच हिंदी महासागर आणि अरबी समुद्रात आपलं वर्चस्व दाखवून दिलं होतं. 16 मार्च रोजी त्यांनी व्यापारी जहाजाची सोमालियन चाच्यांच्या तावडीतून सुटका केली होती. तसंच 35 सोमालियन चाचे ताब्यात घेतले होते. आता कस्टम आणि इमिग्रेशनच्या औपचारिकतेनंतर हे चाचे मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. 17 क्रू मेंबर्सचं अपहरण केल्यानंतर सोमाली चाच्यांनी क्रू मेंबर्सची सुटका करण्यासाठी जहाजाच्या मालकाकडून 500 कोटींची खंडणी मागितली होती. या प्रकरणात 35 सागरी चाच्यांना यलो गेट पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी दिलेल्या तक्रारीच्या आधारे यलोगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात 35 सोमाली चाच्यांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणात 2 पांढऱ्या बोटी, 3 इंजिन, 9 मोबाईल फोन, 196 जिवंत काडतुसे, 1 डाऊन केस, 1 चाकू, 1 सोनी कॅमेरा, 1 सोमाली देशाचा पासपोर्ट, 2 बल्गेरिया पासपोर्ट, ओळखपत्रासह इतर कागदपत्रं जप्त करण्यात आली. - पोलीस उपायुक्त संजय लाटकर
35 चाचांविरोधात गुन्हा दाखल : 35 सोमालियन चाचांविरुद्ध आयपीसी कलम 307, 364(A), 363, 384, 353, 341, 342, 344, (A) 120 (B), 143, 145, 147, 148, 149, 438, 427, 506 अंतर्गत मुंबईतील येलो गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
काय आहे प्रकरण : या समुद्र लुटारुंच्या शोध मोहिमेअंतर्गत नौदलानं भारतीय किनाऱ्यापासून 2600 किलोमीटर दूर असलेल्या या लुटारुंवर कारवाई करुन त्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडलं होतं. सुमारे 40 तास चाललेल्या या कारवाईत नौदलाच्या आयएनएस कोलकाता आणि आयएनएस सुभद्रा युद्धनौका, ड्रोन आणि सागरी कमांडो सहभागी झाले होते.
मार्कोस कमांडोनं विमानातून अरबी समुद्रात घेतली उडी : नौदलानं सांगितलं होतं की, "या मोहिमेचा एक भाग म्हणून हवाई दलाच्या C-17 ग्लोबमास्टर ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टच्या मदतीनं मार्कोस कमांडोंना भारतीय किनारपट्टीपासून 2600 किलोमीटर दूर अरबी समुद्रात सोडण्यात आलं. याशिवाय मार्कोस कमांडोसाठी अनेक खास बोटीही अरबी समुद्रात सोडण्यात आल्या होत्या. या बोटींच्या मदतीनं भारतीय मार्कोस कमांडोनं या अपहरण केलेल्या व्यापारी जहाजावर चढून तिथं कारवाई करुन समुद्री लुटारुंना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडलं.
40 तास चालली मोहिम : नौदलाची ही मोहीम सुमारे 40 तास चालली. या काळात लुटारुंनी भारतीय जवानांवर अनेकवेळा गोळीबारही केला. नौदलाच्या म्हणण्यानुसार, "या महत्त्वपूर्ण बचाव मोहिमेचा एक भाग म्हणून, भारतीय युद्धनौका आयएनएस कोलकातावरील 35 समुद्री लुटारुंना ताब्यात घेण्यात आलं. तसंच या व्यापारी जहाजातील 17 क्रू मेंबर्सचीही सुखरुप सुटका करण्यात आली.
हेही वाचा :