मनमाड : टॅंकरच्या भीषण धडकेत दोन चिमुकल्यांसह तीन जणांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना मनमाड नांदगाव महामार्गावर पानेवाडीजवळ घडली. अपघातानंतर जखमींना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. अपघातातील मृत जळगाव जिल्ह्यातील पारोळा इथले असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे.
टँकरची दुचाकीला जोरदार धडक : याबाबत अधिक माहिती अशी, की मनमाड नांदगाव महामार्गावर दोन दुचाकीला टँकर क्रमांक एमएच 16 सीसी 5524 नं धडक दिली. या अपघातात दोन लहान मुलांसह तीन जणांचा मृत्यू झाला, तर एक लहान मुलगा आणि दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना मनमाड इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर गंभीर जखमींना मालेगाव इथं अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आलं. अपघाताची भीषणता इतकी होती, की दोन्ही दुचाकीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि मनमाड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पुढील तपास पोलीस करत आहेत.
मनमाड नांदगाव महामार्ग बनला मृत्यूचा सापळा : मनमाड ते नांदगाव हा महामार्ग चौपदरी करण्यात आला आहे. मात्र या महामार्गावर इंधन कंपनीचे टँकर सुसाट वेगानं जातात. या टँकर चालकांच्या हलगर्जीमुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. या अपघातातील टँकर चालक दारू प्यायला होता, असा आरोप नागरिकांनी केला. त्यानं मागून दोन्ही दुचाकीला धडक दिली यात तिघांचा मृत्यू झाला. या प्रकारचे अपघात कायम या महामार्गावर होत असल्यानं हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.
हेही वाचा :