मुंबई 26 Malls Threatened With Bombs : नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या इनॉर्बिट मॉल आणि पनवेलमधील ओरीयन मॉलसह एकूण 26 मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी पोलिसांना ई-मेल द्वारे मिळाली होती. या धमकीमुळं सर्वत्र एकच खळबळ उडाल्याचं बघायला मिळालं. मॉलमध्ये खरंच बॉम्ब आहे की नाही याची माहिती नसल्यामुळं सावधगिरीचा उपाय म्हणून दोन्ही मॉल्स रिकामे करण्यात आले. मात्र, तपासणीदरम्यान वाशीच्या इनॉर्बिट मॉलमध्ये कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद वस्तू आढळून न आल्यानं, मॉल पुन्हा सुरू करण्यात आला.
नेमकं काय आहे प्रकरण? : आज (17 ऑगस्ट) 12 वाजेच्या सुमारास इनॉर्बिट मॉलच्या मेल आयडीवर 'हॅलो, मी या बिल्डिंगमध्ये बॉम्ब पेरलेत. इमारतीतील प्रत्येक व्यक्तीला मारलं जाईल' अशा आशयाचा मेल पाठवण्यात आला होता. असाच मेल ओरियन मॉलच्या मेल आयडीवरही आला होता. त्यानंतर दोन्ही मॉल्समधून लोकांना बाहेर काढण्यात आलं. यावेळी इनॉर्बिट मॉलमध्ये वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे, शशिकांत चांदेकर, प्रभारी अधिकारी, बीडीडीएस पथक, डॉग स्कॉड, प्रतिभा शेडगे (प्रभारी एटीएस पथक), फायर ब्रिग्रेड पथक आदी उपस्थित होते.
पुढील तपासणी सुरू : 2.50 वाजेच्या सुमारास मॉलची तपासणी पूर्ण झाली. मात्र, तपासणीदरम्यान कोणतीही बॉम्ब सदृश्य वस्तू किंवा काही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यामुळं काहीवेळानं पुन्हा इनॉर्बिट मॉल सुरू करण्यात आला. तर या घटनेसंदर्भात सध्या पुढील तपासणी सुरू असल्याची माहिती वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांनी दिलीय. तसंच वाशीच्या इनॉर्बिट मॉल आणि पनवेलच्या ओरियन मॉलसह 26 मॉल्सना बाँम्ब ठेवल्याची धमकी मिळाली होती. मात्र, प्रत्यक्ष तपासणीत काही आढळून आलं नसल्यानं ही अफवाच असल्याचं पोलिसांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे.
हेही वाचा -