सांगली : सांगलीच्या विटा येथील शासकीय निवासी शाळेतल्या 23 विद्यार्थ्यांना विषबाधा (Food Poisoning) झाल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास मुलांना देण्यात आलेल्या जेवणातून ही विषबाधा झाल्याचं सांगण्यात येत आहे. आज सकाळपासून मुलांना मळमळ, जुलाब, पोटदुखी आणि अस्वस्थ वाटू लागल्यानंतर तातडीनं त्यांना विट्याच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या सगळ्या विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. समाजकल्याण विभागाच्या विटा येथील शासकीय निवासी शाळेमध्ये हा विषबाधेचा प्रकार घडला असून रात्री मुलांना मटणाचं जेवण देण्यात आलं होतं. त्यामुळं या जेवणातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. एकाचवेळी 23 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानं खळबळ उडाली आहे.
विद्यार्थ्यांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू : विटा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी विशाल नलावडे म्हणाले, "सकाळी काही मुलांना त्रास होऊ लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या वाढली आणि सध्याच्या घडीला 23 विद्यार्थ्यांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या सर्वांनाच प्रामुख्यानं पोटदुखी आणि जुलाब होत असल्याची तक्रार होती. या सर्व विद्यार्थ्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे".
जेवणातून झाली विषबाधा : उपचार घेणाऱ्या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी सांगितलं, "रविवारी चिकन आणि मटण हे जेवणात खाल्लं होतं आणि त्यानंतर दूध पिलं होतं. त्यानंतर आज सकाळपासून आम्हाला पोटदुखी, जुलाब, उलट्या असा त्रास सुरू झाला. त्याबाबत शाळेच्या शिक्षकांना त्याची कल्पना दिली. त्यानंतर आम्हाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं".
'निवासी विद्यार्थी शाळेत' घडली घटना : समाजकल्याण विभागाच्यावतीनं विट्यामध्ये 'निवासी विद्यार्थी शाळा' चालवली जाते. या शाळेमध्ये जवळपास 93 विद्यार्थी शिकतात. रविवार असल्यानं काही विद्यार्थी हे आपल्या घरी गेले होते. तर या ठिकाणी 49 विद्यार्थी उपस्थित होते. यामधील 23 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी विशाल नलवडे यांनी दिली.
हेही वाचा -