ठाणे : शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत चालली आहे. पाळीव कुत्र्यांमुळं ठाणेकरांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आरोग्य विभागाकडून निर्बीजीकरण बंद असल्यामुळं भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढल्याची माहिती, सामाजिक कार्यकर्ते सत्यजित शाह यांनी दिली.
नागरिकांना झाल्या गंभीर जखमा : ठाण्यात २०१९ पर्यंत साठ हजार कुत्र्यांचं निर्बीजीकरण करण्यात आलं होतं. मात्र तीन वर्षांपासून निर्बीजीकरण बंद असल्यामुळं कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यावर नियंत्रण नसल्यामुळं गृह संकुले, झोपडपट्ट्यांमध्ये या भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना घडली. यावर्षीच्या जानेवारी महिन्यापासून नोव्हेंबर अखेरपर्यंत कुत्र्यांच्या चावा घेतल्याचा १३ हजार घटना घडल्या आहेत. त्यात १२०० घटनांमध्ये नागरिकांना गंभीर जखमा झाल्या आहेत.
ठाणे महानगरपालिकेनं केली कारवाई : भटक्या कुत्र्यांपासून होणारा त्रास कमी करण्यासाठी पालिका प्रशासन रेबीजची लस देण्याचं काम करत आहे. २०२४ जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत ४३०५ लसीकरण करण्यात आलं आहे. मागील वर्षी ८००६ कुत्र्यांचं रेबीज लसीकरण करण्यात आलं होतं अशी माहिती, महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागानं दिली आहे.
अनेक योजना कागदावरच : या त्रासदायक असलेल्या भटक्या कुत्र्यांना एकत्र गोळा करून घेवून जाण्याचं पालिका प्रशासनानं ठरवलं होतं. मात्र हा प्रकार कागदावरच राहिला आहे. त्यामुळं भटक्या कुत्र्यांचा त्रास काही केल्या कमी होत नाही.
सर्वाधिक त्रास ज्येष्ठांना आणि लहान मुलांना : भटक्या कुत्र्यांचा सगळ्यात जास्त त्रास हा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना होत असतो. त्यासोबत दूध विक्री करणारे, वर्तमानपत्र वाटप करणारे, रात्री कामावरून उशिरानं घरी जाणारे आणि दुचाकी स्वार हे सर्वाधिक लक्ष्य होतात. या सर्व प्रकाराला रोखण्यासाठी सरकारनं योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी सत्यजित शाह यांनी दिली.
हेही वाचा -